नाशिक : ‘लॉ’ द्वितीय वर्षाच्या निकालाचा टक्का घसरला | पुढारी

नाशिक : ‘लॉ’ द्वितीय वर्षाच्या निकालाचा टक्का घसरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वीच एलएलबीच्या तिसर्‍या वर्षाचा धक्कादायक निकाल घोषित करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली होती. एलएलबीच्या द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून, त्यातदेखील 50.28 टक्केच निकाल लागल्याने, विद्यापीठाकडूनच स्केल डाउन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एलएलबीच्या द्वितीय वर्षाचा निकाल शुक्रवारी (दि. 23) ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात आला. एलएलबी द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी एकूण 3,260 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1,623 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उर्वरीत 1,001 विद्यार्थ्यांना एटीकेटी, तर 604 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. 32 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. या धक्कादायक निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, विद्यापीठाने स्केल डाउन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. कोरोना महामारीनंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. अशात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामध्ये बहुतांश महाविद्यालयांनी अभ्यासक्रमच पूर्ण केला नसल्याने, अर्धवट शिकवलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्याचबरोबर तब्बल दीड वर्ष बहुपर्यायी पद्धतीने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याने, दीर्घोत्तरी परीक्षा देण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर होते. अशात विद्यापीठाने निम्म्या अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी किंवा बहुपर्यायी प्रश्नोत्तरांचा पर्याय ठेवावा, अशी मागणी सातत्याने विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र, विद्यापीठाने या सर्व मागण्या फेटाळून लावत परीक्षा घेतल्या. याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे निकालावरून स्पष्ट होते. निम्मे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने, विद्यापीठानेच स्केल डाउन केल्याचा आरोपही आता विद्यार्थ्यांकडून होत आहे. दरम्यान, या निकालामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून, याबाबतचा जाब विद्यापीठाकडे विचारणार असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अंतर्गत गुणाला कात्री :
लेखी परीक्षेत गुण कमी पडले असले, तरी महाविद्यालयांकडून अंतर्गत गुण समाधानकारक दिले जातील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र, महाविद्यालयांनीही हात आखडता घेतल्याने, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. अंतर्गत गुणांसाठी आवश्यक असलेल्या असाइनमेंट वेळेत देऊनदेखील महाविद्यालयांकडून अनेक विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण कमी दिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा:

Back to top button