नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी | पुढारी

नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगगडावर सोमवार (दि.26) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर तसेच 8 व 9 ऑक्टोबरला गडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, तसे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून गडावर साधे पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. तर श्री भगवतीच्या मूर्ती संवर्धन कामामुळे मागील दोन महिन्यांपासून देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवात गडावर अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता आणि होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी आदेश काढत नवरात्रोत्सवात गडावर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. या काळात गडाचा पायथा ते मंदिरापर्यंत एसटी महामंडळाच्या बसेसलाच केवळ वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

खासगी वाहने नांदुरी गावापर्यंतच धावणार असल्याने नवरात्रोत्सवात गडाच्या पायथ्याशी नांदुरी गावापर्यंतच खासगी वाहनांनी प्रवास करता येणार आहे. तेथून पुढे गडावर पोहोचण्यासाठी भाविकांना एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करावा लागणार आहे. तसेच कोजागरी पौर्णिमेलादेखील गडावर कावडधारी भक्तांचा जनसागर उसळतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 8 व 9 ऑक्टोबर रोजी हा नियम लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाईचा इशारादेखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button