Dhule : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मोरे यांना शिवसेनेचा घेराव, रुग्णालयातील समस्यांचा वाचला पाढा | पुढारी

Dhule : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी मोरे यांना शिवसेनेचा घेराव, रुग्णालयातील समस्यांचा वाचला पाढा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील कार्यरत सर्व 13 विभागातील कार्यप्रणाली बिघडली असून नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळण्याऐवजी नरक यातना सोसाव्या लागत आहेत. रुग्णालयातील स्वच्छतेसोबत रुग्णालयाचा प्रत्येक विभाग हा समस्यांनी ग्रासला असून शासनाकडून दरवर्षी मिळणारा कोट्यावधी रुपयांचा निधी जातो कुठे हा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर अरुण मोरे यांना घेराव घालून शिवसेनेने संतप्त भावना व्यक्त केली आहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुणालयात अनागोंदी कारभार सुरु असून त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने शिवसेनेकडे झाल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाची या समस्यांबाबत चर्चा केली. या गैरसोयी दहा दिवसात तातडीने दूर करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला. शिवसेना रुग्णांसाठी आंदोलनाच्या भूमिकेत असली तरीही रुग्णालयाच्या प्रशासनाला अडचण असल्यास सहकार्य करण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रभारी ङिन ङाॅ.अरूण मोरे यांना निवेदनाच्या माध्यमातून प्रश्नांकङे लक्षवेधून त्या कधी आणि किती काळात सुटतील याचे उत्तर मागितले. तब्बल दिङ तास चाललेल्या चर्चेत शिवसेनेने प्रशासनाला अडचणीच्या ठिकाणी मदतीचे आश्वासन देखील दिले.

रुग्णालयातील स्वच्छता, आयसीयु वार्ड, जनरल वार्ड, सर्जरी, स्त्रीरोग तसेच जनरल ओपीडी वार्ड व इतर विभाग येथील स्वच्छता गृहे यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्हरांड्यात कचरापेटी, वॉटर बेसीन नसल्याने रुग्णाचे नातेवाईक घाण, कचरा सरळ पोर्चमध्ये टाकतात. सद्यस्थितीत रुग्णालयाच्या पोर्चमध्ये शेकडो टन कचरा गोळा झाला आहे. अपघात विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही. रुग्णालयाच्या विविध विभागात औषधांचा पुरवठा पुर्णपणे होतच नाही. औषधांची कमतरता भासते. डॉक्टर रुग्णांना प्रिस्क्रीप्शन लिहून देत नाहीत. अनेकदा वारंवार लागणारे प्राथमिक उपचाराचे औषधे, इंजेक्शने कधीच उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.

जनरल मेडिसीन विभागात टीबी रुग्ण, कोरोना रुग्ण, आणि इतर आजारांचे रुग्ण यांना एकत्रित उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनाही संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होतो. टीबी रुग्णांकरीता स्पेशल वार्डाची निर्मिती कधी करणार ? असा प्रश्न यावेळी शिवसेनेने उपस्थित केला.

मेडिसीन विभागात जनरल ओपीडीचे रुग्ण तपासणीसाठी टाळाटाळ केली जाते. येथील प्राध्यापक जनरल ओपीडीसाठी कधीच वेळ देत नाहीत. जनरल ओपीडीवर रेसिडेन्ट डॉक्टरांनी कब्जा केला असून इंटरनशीप करणारे विद्यार्थी जनरल ओपीडी चेक करतात. तोच प्रकार सर्जरी व अपघात विभागात सुरु असून त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार मिळण्यास वेळ लागतो. संपूर्ण रुग्णालय हे इंटरनशीप करणारे विद्यार्थी यांच्या हातात दिले गेले आहे. असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

स्त्रीरोग वार्डात युनीट 1 चा पेशंट असेल तर दुसऱ्या युनिटचे डॉक्टर त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी वेळ लागतो. युनिट 1 युनिट 2 यांच्या वादात डिलेव्हरी पेशंटला डिस्चार्ज देण्यास वेळ लागतो. परिणामी रुग्णांना विनाकारण अनेक दिवस रुग्णालयात मुक्काम करावा लागतो. महिला विभागातील अनेक मशनरी बंद अवस्थेत आहेत.

सिटीस्कॅन मशीन गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्याबाबत काय कार्यवाही केली, तसेच एमआरआय मशीन या रुग्णालयात कधी उपलब्ध होणार. एक्सरे मशीन साठी देखील तीच अवस्था असून या ठिकाणी दररोज रुग्णांना लांबच्या लांब रांगा लावाव्या लागतात. एक्सरे फोटोसाठी लागणारी फिल्म गेल्या वर्षभरापासून रुग्णांना दिली जात नाही. रुग्णांना एक्सरेचे फोटो मोबाईलमध्ये काढून दिले जातात. बऱ्याच ग्रामीण भागातील रुग्णांकडे मोबाईल नसल्याने त्यांना इतरांकडून मोबाईल घेऊन काम चालवावे लागते. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असल्याचे सांगत याबाबत शिवसेनेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

रुग्णालय प्रशासनाने तातडीने या समस्या दूर कराव्यात अन्यथा शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, कैलास पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप, , मच्छिंद्र निकम, महादू गवळी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button