नाशिकमध्ये 'वेदांता'वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन | पुढारी

नाशिकमध्ये 'वेदांता'वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
वेदांता व पॉस्कोन प्रकल्प केंद्र शासनाने गुजरातला स्थलांतरित करित महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार केल्याचा आरोप करीत नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महसूल आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हा प्रकल्प हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव येथे होणार होता. परंतु अचानकपणे हा प्रकल्प गुजरातला पळविण्यात आला. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु प्रकल्प आता गुजरात येथे हलविण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या वाट्याला बेरोजगारी आली आहे. असा आरोप करीत प्रकल्प गुजरातला हलविण्याच्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येऊन आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी केंद्रशासन व राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे, तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर निवृत्ती अरिंगळे, पुरुषोत्तम कडलग, योगेश निसाळ, जगदीश पवार, विक्रम कोठुळे, प्रशांत वाघ, चैतन्य देशमुख, मंगेश लांडगे आदि सहभागी झाले होते. आंदोलनानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा :

 

Back to top button