अमेरिकेतील पुरुषांमध्ये उंची वाढवणार्‍या शस्त्रक्रियेची ‘क्रेझ’ | पुढारी

अमेरिकेतील पुरुषांमध्ये उंची वाढवणार्‍या शस्त्रक्रियेची ‘क्रेझ’

वॉशिंग्टन : ‘सुंदर मी होणार’ असे म्हणत अनेक तरुणी (आणि तरुणही) कॉस्मेटिक सर्जरी करून घेत असतात. पूर्वी केवळ नट-नट्यांमध्येच अशा शस्त्रक्रिया होत असत. हल्ली सामान्य तरुण-तरुणींमध्येही त्या होत आहेत. इतकेच नव्हे तर आता अमेरिकेतील पुरुषांमध्ये उंच दिसण्याचीही ‘क्रेझ’ दिसून येत आहे. त्यासाठी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अशा शस्त्रक्रियेने पायांची लांबी तीन ते सहा इंच वाढवता येऊ शकते.

सध्या गुगल, अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि मेटासारख्या टेक कंपन्यांमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर्समध्ये ही क्रेझ अधिक प्रमाणात दिसत आहे. अमेरिकेत उंची वाढवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेची सुरुवात ‘लिंबप्लास्ट’ने केली. या संस्थेचे संस्थापक केव्हिन देबीपार्सड यांनी सांगितले की माझ्याकडे इतके ‘टेक’ रुग्ण आहेत की मी एक टेक कंपनीही उघडू शकतो! सध्या ऑपरेशनसाठी वीस रुग्ण रांगेत आहेत. माझ्याकडे मायक्रोसॉफ्टचे सर्वाधिक कर्मचारी अशा ऑपरेशनसाठी आले. गुगल, अ‍ॅमेझॉन आणि फेसबुकचेही अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनी ही शस्त्रक्रिया करवून घेतली आहे.

कोरोना काळात सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्या. या शस्त्रक्रियेत डॉक्टर रुग्णाच्या मांडीचे हाड मोडतात. त्यानंतर त्यामध्ये मेटल नेल टाकले जाते. त्याला हवे तसे ‘अ‍ॅडजेस्ट’ करता येते. ऑपरेशनच्या तीन महिन्यांपर्यंत हे मेटल नेल मॅग्नेटिक रिमोट कंट्रोलद्वारे हळूहळू लांब केले जातात. त्यानंतर हाडे मजबूत होण्यासाठी काही महिने लागतात. ऑपरेशन करवून घेतलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने सांगितले की ऑपरेशननंतर तो तीन महिने घरीच होता. एखाद्या खेळाडूने असे ऑपरेशन करवून घेऊ नये असे सर्जन सांगतात. या ऑपरेशनने उंची वाढली तरी हाडे कमजोर होतात.

Back to top button