नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर | पुढारी

नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 18) सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन ठप्प झाले. गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा वाढता प्रभाव लक्षात घेत सायंकाळी धरणाचा विसर्ग आठ हजार क्यूसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून, पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले आहे. निफाड आणि सिन्नरच्या काही गावांत रात्री 8 च्या सुमारास मुरसळधार पावसास सुरुवात झाली होती.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र तसेच बाष्पामुळे गत पाच दिवसांपासून पाऊस परतला आहे. जिल्ह्यातही त्याने सर्वदूर हजेरी लावल्यानंतर शनिवारी (दि. 17) दुपारी काहीशी उघडीप दिली. पण, मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाचा वेग वाढला. नाशिककरांची रविवारची पहाटच संततधार पावसाने झाली. दुपारी काही क्षणांच्या विश्रांतीनंतर रात्री उशिरापर्यंत मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे शहराच्या सखल भागातील रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली.

त्र्यंबकेश्वर परिसर आणि गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणाच्या विसर्गात 1,608 क्यूसेकवरून टप्प्याटप्प्याने वाढ करत 8,000 क्यूसेक करण्यात आल्याने गोदावरीला पूर आला आहे. त्यामुळे काठावरील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली आहेत. धरणांमधील सद्यस्थितीत उपयुक्त पाणीसाठा 64 हजार 513 दलघफू म्हणजे 98 टक्के इतका आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून यंदाच्या हंगामात 1 लाख 1 हजार 22 दलघफू म्हणजे 100 टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले. अद्यापही धरणांचा विसर्ग कायम आहे. दरम्यान, जायकवाडीची मृतसाठ्यासह क्षमता 103 टीएमसी आहे.

Back to top button