नाशिक : बांधकाम विभागाचे अजबच मीटर! नऊ मीटर रस्त्याला अवघा सात मीटरचा पूल | पुढारी

नाशिक : बांधकाम विभागाचे अजबच मीटर! नऊ मीटर रस्त्याला अवघा सात मीटरचा पूल

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा
कामटवाडा परिसरातील इंद्रनगरी आणि मोगलनगर भागातील नैसर्गिक नाल्याला जोडणार्‍या 9 मीटर रस्त्याला जोडणारा पूल केवळ सात मीटरचा तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब नागरिकांच्या जागरूकतेमुळे समोर आली आहे. यासंदर्भात शिवसेना महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आवाज उठविला असून, या कामाच्या उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नैसर्गिक नाल्याला जोडणारा रस्ता 9 मीटरचा असताना, संबंधित पूल 7 मीटरचा बांधण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे नाल्याची रुंदीदेखील 25 मीटरवरून 10 मीटर करण्यात आलेली आहे. पुलाची उंचीदेखील रस्त्यापेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अतिवृष्टी झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊन दुर्घटना होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याला जबाबदार कोण असेल, याचे उत्तर प्रशासन देईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांच्या तक्रारीवरून शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना विभागप्रमुख पवन मटाले, राहुल पाटील, पंकज जाधव यांच्यासह सातपूर विभाग बांधकाम अधिकारी शिंगाडे, पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे, बांधकाम विभागाचे विनीत बिडवई यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अविनाश काकडे, दिग्विजय सोनवणे, जितेंद्र भालेराव, राजेंद्र सुतार, सुभाष शुकले, दिनेश तेली, डॉ. शरद बगडाने, रोहित शिंदे, साधना मटाले, उज्वला अहिरे, पूनम महाजन, संगीता घाडगे, विजया शिरोडे, मीना पाटील, ललित पवार आदी उपस्थित होते.

सन 1992 च्या शहर विकास आराखड्यामध्ये दर्शविलेली संबंधित नैसर्गिक नाल्याची लांबी-रुंदी आणि प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू असताना दर्शविण्यात आलेली लांबी-रुंदी यामध्ये मोठी तफावत आहे. मनपाने 9 मीटर रस्त्यावर 7 मीटर पूल बांधणे सयुक्तिक नाही. येथील लेआऊटधारकास जमिनीचा एफएसआय व प्लॉट एरिया जास्त मिळावा, यासाठी प्रशासनाने केलेली कृती आहे. या सर्व बाबींचा विचार करता पुलासाठी केलेला दीड कोटीचा खर्च व्यर्थ जाऊन नागरिकांना त्रास होईल.
– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

हेही वाचा :

Back to top button