पुणेकरांची उडाली तारांबळ, नदीपात्रालगतच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत | पुढारी

पुणेकरांची उडाली तारांबळ, नदीपात्रालगतच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शुक्रवारीही पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. खिलारीवाडी, पुलाचीवाडी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.

धरणातून शुक्रवारी सुरू असलेल्या विसर्गामुळे विठ्ठलवाडी भागात नदीपात्रात असलेले विठ्ठल मंदिर पाण्याखाली गेले. म्हात्रे पुलाजवळील खिलारेवाडी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिक कुटूंबीयांना घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. पुलाची वाडी येथे नदीपात्रालगच्या घरांमध्येदेखील पाणी शिरल्याचे दिसून आले.

झेड ब्रीज खाली असलेल्या हॉटेल आणि छोट्या मोठ्या दुकानांमध्येसुद्धा पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे हाल झाले. नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली गेला होता, तर ओंकारेश्वर मंदिरातदेखील शुक्रवारी पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. नदीपात्रातील रस्ते तर पाण्याखाली गायब झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.

Back to top button