जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच | पुढारी

जळगाव : रावेरमध्ये सुकी नदीपात्रात झालाय मृत बैलांचा खच

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चिनावल-उटखेडा गावादरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुलाखाली तब्बल २२ बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या ठिकाणी निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी फौजफाट्यासह हजर झाले. चिनावल येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृत बैलाला जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि. १६) सकाळी शेतात जाणाऱ्या मजुरांना पुलाजवळ दुर्गंधी आल्याने बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे वृत्त वाऱ्यासारखी पसरले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व निंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुलापासून तब्बल दीड किमी अंतर वाहून गेलेल्या बैलाला काढून जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करून पुरवण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी चिनावल येथील श्रीकांत सरोदे, हितेश भंगाळे, निलेश गारसे, विशाल बोरोले, योगेश पाटील, गजू साळुंके, किरण महाजन, वैभव नेमाडे व पशु संवर्धन विभागाचे डॉ लहासे, राजपूत, धांडे उपस्थित होते.

बैलांच्या मृत्यूबाबत शंका…
प्रथमदर्शनी पाहता पुलावरील एखाद्या वाहनातून त्यांना खाली पात्रात फेकून दिले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हे बैल लम्पीमुळे मृत झाले की, अन्य कारणाने? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यातील एखाद्या वाहनात गुरे गुदमरून मेली असल्याने त्यांना नदीपात्रात टाकले असावे का? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे. कारण, यातील काही गुरांच्या गळ्याला दोराचा फास लागल्याचेही समोर येत आहे.

हेही वाचा:

Back to top button