नाशिक : दातली येथील गुळवंच शिवारात बिबट्याचा भरदुपारी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला | पुढारी

नाशिक : दातली येथील गुळवंच शिवारात बिबट्याचा भरदुपारी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील गुळवंच शिवारात गुरुवारी (दि.15) दुपारी 1 च्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला करत दोन मेंढ्यांचा फडशा पाडल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे. दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने परिसरातील शेतकरी भयभयीत झाले आहेत.

गुळवंच शिवारात मेंढपाळ जयराम सदाशिव देवकर यांच्या मेंढ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. देवकर हे दगडवाडी गावच्या बाजूने असणार्‍या रतन इंडियाच्या संरक्षक भिंतीलगत मेंढ्या चारत होते. पाऊस असल्याने छत्रीच्या आडोशाला बसलेले असताना बिबट्याने अलगद पाठीमागून येऊन मेंढ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मेंढी गंभीर जखमी झाली. देवकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही क्षणातच बिबट्याने धूम ठोकली. घटनेची माहिती सरपंच भाऊदास शिरसाट यांना समजताच त्यांनी तत्काळ वन विभागाच्या कर्मचार्‍यांना याबाबत माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी वत्सला कांगणे आणि मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

पिंजरा लावण्याची मागणी
दिवसाढवळ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी शेतात जाण्यास धास्तावले आहेत. गुळवंच परिसरात तत्काळ पिंजरा लावण्यात यावा तसेच देवकर यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह सरपंच भाऊदास शिरसाठ यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button