वेल्हे : उघडिपीनंतर खडकवासला साखळीत रिमझिम | पुढारी

वेल्हे : उघडिपीनंतर खडकवासला साखळीत रिमझिम

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरण साखळीत गुरुवारी (दि. 15) दिवसभर उघडिपीनंतर पावसाची रिमझिम सुरू होती. पाण्याची आवक कायम असल्याने चारही धरणांतून पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात 10 हजार 246 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र, डोंगरी पट्ट्यात अचानक जोरदार सरी कोसळत आहेत.

पावसाचे प्रमाण वाढल्यास मुठा नदीत जादा पाणी सोडण्यात येणार आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. जादा पाणी सोडूनही खडकवासला साखळीतील सर्व चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला-सिंहगड भागासह शहरात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे; मात्र डोंगरी पट्ट्यात पाऊस सक्रिय असल्याने पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणातून जादा पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

सिंहगड खडकवासला भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उघडिपीनंतर ऊन पडले होते. मात्र पानशेत, वरसगाव, मुठाच्या डोंगरी पट्ट्यात अधूनमधून सरी कोसळत आहेत. ओढ्या-नाल्यांतील पाण्याची आवक सुरू आहे. गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेत येथे 7, वरसगाव येथे 8, टेमघर येथे 10 व खडकवासला येथे 1 मिलिमीटर पाऊस पडला.

Back to top button