Nashik : सारुळसह पिंपळद, राजूरमधील 21 खाणपट्टे सील, जिल्हाधिकार्‍यांची कारवाई | पुढारी

Nashik : सारुळसह पिंपळद, राजूरमधील 21 खाणपट्टे सील, जिल्हाधिकार्‍यांची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून गौणखनिजचे अधिकार काढून घेतल्याच्या काही तासांतच जिल्ह्यातील 21 खाणपट्टे सील केल्याने गौणखनिज विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष बाब म्हणजे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीतच जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचा निर्णय घेतल्याने त्यास ‘अर्थ’ प्राप्त झाला आहे. नाशिक तालुक्यातील सारुळच्या 19, तर पिंपळद आणि राजूरची प्रत्येकी एक असे एकूण 21 खाणपट्टे सील करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध भागांमध्ये नियमांना फाट्यावर मारत खाणपट्टे राजरोसपणे सुरू आहेत. या खाणपट्ट्यांना अभय कोणाचे यावरून वेळोवेळी चर्चाही रंगली आहे. शासनाने तात्पुरते परवाने देणे बंद केल्याने, भाडेपट्ट्याने आणि खासगी जमिनीवर खाणपट्ट्यांची परवानगी घेण्यासाठी विविध नियमांची पूर्तता करण्यासह पर्यावरणीय परवानग्याही बंधनकारक केल्या आहेत. मात्र, कागदोपत्री पूर्तता दाखविताना प्रत्यक्ष जागेवर नियमबाह्य व सर्व नियमांना पायदळी तुडवत डोंगरांचे लचके तोडण्याचे काम या खाणपट्टेधारकांकडून राजरोसपणे सुरू होते. विशेष बाब म्हणजे शासनाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून वेळोवेळी या खाणपट्ट्यांची पाहणीही केली जात होती. मात्र, कारवाईचा साधा फार्सही दिसून न आल्याने, अधिकारी नेहमीच संशयाच्या भोवर्‍यात राहिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून गौणखनिजचे अधिकार काढून घेत स्वत:कडे ठेवल्याने या संशयाला आणखीनच बळकटी मिळत आहे. शिवाय अधिकारात कपात केल्याच्या काही तासांतच मंत्र्यांच्या उपस्थितीत खाणपट्टे सील करण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

दरम्यान, दत्तप्रसाद नडे यांनी गेल्या महिन्यात या खाणींची गौणखनिज पथकासह तपासणी केली होती. त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 21 खाणींना सील केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकारात कपात केल्यानंतर खाणी सील करण्याबाबतचे आदेश समोर आल्याने कारवाई जिल्हाधिकार्‍यांची की अपर जिल्हाधिकार्‍यांची, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अटी-शर्तींची पूर्तता केल्याशिवाय परवानग्या देणार नसल्याचा पवित्रा गौणखनिज विभागाने घेतल्याने खाणपट्टेधारकांची चांगलीच गोची झाली आहे. शिवाय बेकायदेशीरपणे वाहतूक करताना आढळल्यास अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक अशा स्वरूपाची कठोर कारवाईदेखील केली जात असल्याने सारुळसह परिसरातील कामकाज ठप्प झाले आहे.

नडे चौकशीच्या फेर्‍यात?
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून गौणखनिजचे अधिकार काढून घेत स्वत:कडे घेतल्याच्या काही तासांतच सारुळसह पिंपळद आणि राजूर येथील तब्बल 21 खाणपट्टे सील करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकार्‍यांकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई असून, एकप्रकारे अपर जिल्हाधिकारी नडे यांना चौकशीच्या फेर्‍यात ओढणारी असल्याची चर्चा आता रंगली आहे.

महिनाभरापूर्वीच खनिकर्म अधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि सर्कल यांच्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन खाणींची तपासणी केली होती. त्यानुसार 21 खाणींना सील करण्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहे. आता हे सर्व कामकाज जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्याकडे घेतल्याने अधिक माहिती त्यांच्याकडूनच घेता येईल.
– दत्तप्रसाद नडे,
अप्पर जिल्हाधिकारी

या सात बाबींच्या आधारे कारवाई
खाणपट्ट्यात किती उत्खनन झाले याची नोंदवहीच नाही
खाणपट्टा परिसरात सीमांकन केलेले नाही
डोंगर, टेकडी कापताना 6 मीटर खोलीच्या नियमांचे पालन नाही
खाणपट्ट्यांचा करारनामा करून घेतला नाही
टेकड्यांचे शिखरे व उतार या ठिकाणांवरून गौणखनिजांचे उत्खन्न करण्यावर बंदी असताना उत्खनन सुरूच
डोंगररांगेत उत्खनन झाल्याचे आढळून आले
मायनिंग प्लॅनच्या मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात उत्खनन केल्याबाबत भूमिअभिलेख यांच्याकडून मोजणी करून मोजणी नकाशा सादर करण्याच्या लेखी सूचना देऊनही तो सादर केला नाही.

हेही वाचा :

Back to top button