

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी कॅम्पातील साधू वासवानी उद्यानाजवळील सिक्कीबाई हाउसिंग सोसायटीमधील पार्किंगच्या आवारात बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे. तेथे शाळा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत असून, विद्यार्थ्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार सोसायटीने सहकार आयुक्त तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे. कारवाई न केल्यास उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोसायटीच्या पार्किंगमधील सुमारे 2 हजार चौरस फूट जागेत अतिक्रमण केले आहे. सिक्कीबाई धर्मानी पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी सोसायटीच्या सभासदांवर दबाव टाकून पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून वर्गखोल्यांचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या अनधिकृत बांधकामांची पालिकेच्या करसंकलन विभागातही नोंद करण्यात आली आहे.
पार्किंग उपलब्ध नसल्याने रहिवाशांना नाईलाजास्तव रस्त्यांवर वाहने उभी करावी लागत आहेत. विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच, पार्किंगच्या आवारात गैरकृत्य सुरू असतात. पालिकेने नोटीस दिल्याने सोसायटीची धोकादायक भिंत काढून घेण्यात आली. त्यामुळे भिंत पडून दुर्घटना घडण्याचा धोका टळला आहे. याच शाळेचे वैभव नगर, पिंपरी कॅम्प येथे निळ्या पूररेषेत अनधिकृतपणे उभारलेल्या इमारतीमध्ये शाळा सुरू आहे. नदीचे पाणी वाढल्यास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अनधिकृत व धोकादायक इमारतीमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी देऊन शिक्षण विभाग त्यांच्या जीविताशी खेळत आहे.
सोसायट्या पार्किंगमध्ये सुरू असलेली ही बेकायदा शाळा तत्काळ बंद करावी. पार्किंगमधील अनधिकृत बांधकाम हटवून सोसायटीच्या ताब्यात घ्यावे. अन्यथा कुटुंबासह उपोषण आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशी किरण बुधवानी, गिरीष काजवानी, सतपालसिंग साहोता, एस. अरासापन, शाम जागवानी, राजेश रोचीरामनी आदींनी केली आहे.
सदनिकाधारकांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे
या सोसायटीचे बांधकाम आम्ही केले. सोसायटीची रितसर नोंदणी झाल्यानंतर पार्किंगची जागा वापरण्यास 12 सदनिकाधारकांनी पूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. शाळेसाठी सर्व त्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. 40 वर्षे जुन्या या सोसायटी इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यात शाळेला समावेश होऊ नये म्हणून त्याला आता सूडबुद्धीने विरोध केला जात आहे, असे रूपचंद धर्मानी यांनी सांगितले.