

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-वणी रस्त्यावरील वलखेड फाटा येथील वळणावर भरधाव ट्रकने एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर गर्दीचा फायदा घेत ट्रक चालक फरार झाला आहे.
अधिक माहितीनुसार, वलखेड रोडला अवनखेड हद्दीत हा अपघात झाला. ट्रक (ट्रक क्र.MH 15 FV 5557) ने येथील रस्त्यावर उभे असलेल्या नाशिक येथील कपालेश्वर फार्मा कंपनीचा कामगार संजय एकनाथ निकम (54) पेठरोड, नाशिक यास चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रक चालक गर्दीचा फायदा घेत पळून गेला.
मृतदेह दिंडोरी येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पी. आय. प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुळशीराम जाधव, पोलीस नाईक प्रसाद सहाने हे अधिक तपास करित आहे.