नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका शिक्षण विभागातील मनपा तसेच खासगी शाळांमधील 10 शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी (दि.13) कालिदास कलामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, डिजिटल स्कूलसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले.
यावेळी मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वैशाली नितीन ठोके (मनपा शाळा क्र.78 अंबड), छाया नामदेव माळी (मनपा शाळा 6, शिवाजी वाडी), गायत्री भास्कर सोनवणे (मनपा शाळा क्र. 10 पंचवटी), महेंद्र नारायण जाधव (शाळा क्र. 74 जाधव संकुल), रूपाली महेंद्र चव्हाण (शाळा क्र. 77 अंबड), कल्पना अनिल कराड (नूतन मराठी प्रा. शाळा), नितीन जिभाऊ पाटील (सुखदेव प्रा. मराठी विद्यामंदिर इंदिरानगर), सविता पांडुरंग कुलकर्णी (नवीन मराठी शाळा नाशिकरोड), नीलेश गौरीशंकर तिवारी (मॉडर्न एज्युकेशन सोसायटी विद्यालय अशोकनगर) यांना शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक प्रदान करून उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, माझ्या जीवनात शिक्षकांचे स्थान मोलाचे आहे. त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत कार्यरत आहे. शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी व समाज जडणघडणीत महत्त्वाचे आहे. आजकाल जातीय तेढ निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक शिक्षकांनी प्रामाणिकपणे कार्य करावे. सर्व शैक्षणिक सुविधा तसेच डिजिटल स्कूलसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रमुख वक्ते सचिन जोशी यांनी 'शैक्षणिक धोरण व नवीन तंत्रज्ञान' यावर मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी प्रास्ताविक केले. मंगेश पाठक, बाळासाहेब सातपुते यांनी सूत्रसंचालन केले तर, दीपाली वरुडे यांनी पसायदान म्हटले. याप्रसंगी व्यासपीठावर मनसे शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले तसेच राजेश दाभाडे, आदिवासी शिक्षक संघटनेचे निमंत्रक मोतीराम पवार, धर्मेंद्र बागूल, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पोपट घाणे, शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजीव दातीर, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विठ्ठल नागरे, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सगीर शेख, समता शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजकुमार चव्हाण, खासगी प्राथमिक मुख्याध्यापक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र निकम, अधीक्षक चंद्रकांत थोरात, बाबासाहेब वाघ, राजेंद्र दीक्षित, सुदाम धोंगडे उपस्थित होते.