नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकतर्फे प्रवासी संख्येचा विचार करता, तीन नवीन मार्ग तसेच तीन जुन्याच मार्गांवर बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन मार्गांवर आता एकूण ५४ बसफेऱ्या होतील, तर तीन जुन्या मार्गांवर दर 15 मिनिटांनी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार आहे.
मार्ग क्रमांक १३४ वर नवीन सीबीएस ते कोणार्कनगर (संकलेचा सोसायटी) मार्गे निमाणी, अमृतधाम हा नवीन मार्ग सुरू करण्यात आला असून, या मार्गावर सकाळी ६.१० वाजेपासून २०.४५ वाजेपर्यंत एकूण २० बसफेर्या देण्यात आल्या आहेत. मार्ग क्रमांक १३५ – नवीन सीबीएस ते पार्कसाइडमार्गे अमृतधाम, विडी कामगारनगर हा नवीन मार्ग सुरू करण्यात आला आहे. या मार्गावर सकाळी ६.१० पासून १९.५० पर्यंत एकूण १८ फेर्या होतील. मार्ग क्रमांक १४७ – नवीन सीबीएस ते मोहाडीमार्गे म्हसरूळ, वरवंडी, शिवनई, आंबे या नवीन मार्गावर दोन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सकाळी ५.३० ते १८.३५ पर्यंत एकूण १६ फेर्या होतील.
तसेच मार्ग क्रमांक १२८ वरील निमाणी ते चुंचाळे गाव मार्गे त्रिमूर्ती चौक, कामटवाडे या मार्गावर नवीन ४ बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे आता या मार्गावर पूर्वीच्या ४ व नवीन ४ अशा एकूण ८ बसेस कार्यरत असतील. बसेस संख्या वाढविल्याने या मार्गावर दर १५ मिनिटांना बसफेर्या उपलब्ध असणार आहेत. मार्ग क्रमांक २०१ वरील नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, सिव्हिल, सातपूर, अशोकनगर या मार्गावरील बसफेर्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने आता पूर्वीच्या अर्धा तासाऐवजी दर १५ मिनिटांनी बसफेर्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मार्ग क्रमांक २०३ वरील नाशिकरोड ते सिम्बायोसिस कॉलेज मार्गे सीबीएस, पवननगर, उत्तमनगर या मार्गावरील बसफेर्यांमध्ये वाढ केल्याने अर्धा तासाऐवजी आता दर १५ मिनिटांनी बसेस उपलब्ध होतील. प्रवाशांची वाढती संख्या व मागणी लक्षात घेता, हे नवीन मार्ग सुरू करण्याबरोबरच काही मार्गांवरील बसफेर्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकतर्फे करण्यात आले आहे.