जळगावात महापौरांच्या घरावर फेकले पेटवलेले सुतळी बॉम्ब, दगड ; ४३ जणांवर गुन्हे दाखल | पुढारी

जळगावात महापौरांच्या घरावर फेकले पेटवलेले सुतळी बॉम्ब, दगड ; ४३ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरात गणेश विसर्जन पार पडत असताना मेहरूण परिसरात रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटवलेले सुतळी बॉम्ब आणि दगड फेकले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

 महापौर जयश्री महाजन
महापौर जयश्री महाजन

जळगाव शहरातील मेहरून परिसरात महापौर महाजन यांचे निवासस्थान आहे. महापौरांच्या घराजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती. मंडळाचे कार्यकर्ते महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळ आले असता, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला. तसेच काही वेळाने दगड आणि पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले. या हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांनी गणरायाची मूर्ती तिथेच सोडून देत पळ काढला. पळून जाण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या कारच्या काचाही फोडल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांनी महापौरांचे निवासस्थान गाठले आणि घटनेची माहिती घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरिता कोल्हे, मानसिंग सोनवने यांनी रात्रीच महापौर जयश्री महाजन यांची भेट घेतली.

तीघांना घेतले ताब्यात…
महापौरांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४३ जणांच्या विरोधात दंगलीसह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यातील १८ जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button