Nashik : मुंबई-आग्रा महामार्ग होणार प्रकाशमय; असे उभारणार एलईडी पथदीप | पुढारी

Nashik : मुंबई-आग्रा महामार्ग होणार प्रकाशमय; असे उभारणार एलईडी पथदीप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरासह परिसरातील महामार्गावरील अपघातांचे आणि अंधारातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रकाशमय व्हावेत, यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. त्यास यश आले आहे. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिस रोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या मार्गांवर नव्याने विजेचे 924 पोल उभारण्यात येणार आहेत.

नाशिक शहर परिसरातील आणि नाशिक-आग्रा महामार्गावर विजेचे पोल फारच कमी व सतत बंद स्थितीत असल्याने महामार्गावर कायमच लहान-मोठे अपघात होत असतात. पावसाळ्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असते. अंधाराचा फायदा घेत लुटारूंकडून रस्त्यावरील प्रवाशांना लुटल्याच्या अनेक घटना घडतात. ही स्थिती टाळण्यासाठी महामार्गावर एलईडी असावेत, यासाठी खा. गोडसे प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले. केंद्राच्या भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहर परिसरातील मुंबई-आग्रा महामार्ग तसेच वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिस रोडवर विजेचे पथदीप बसविण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी आठ कोटी 76 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

असे उभारणार एलईडी पथदीप
नाशिक शहर परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गाच्या 40 किमी अंतरावर दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडसह 544, वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल या दरम्यानच्या 10 किमीच्या अंतरावर 322, तर कोकणगाव शिवारातील सुमारे पावणेदोन किमी अंतरावर 58 एलईडी नव्याने बसविण्यात येणार आहेत. या निधीतूनच देखभालही करण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात येणार्‍या विजेच्या पोलमुळे शहर आणि परिसरातील महामार्ग प्रकाशमय होणार असून, अपघातांचे प्रमाण अत्यल्प होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button