पुणे : यंदाचा गणेशोत्सव ठरतोय कलाकारांसाठी कमाईचा; राज्यभरात होताहेत कार्यक्रम | पुढारी

पुणे : यंदाचा गणेशोत्सव ठरतोय कलाकारांसाठी कमाईचा; राज्यभरात होताहेत कार्यक्रम

सुवर्णा चव्हाण

पुणे : यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव कलाकारांसाठी काहीसा खास ठरत आहे….कारण दोन वर्षे गणेशोत्सवाच्या सीझनमध्ये कार्यक्रम सादर करता न आल्याने कलाकार आर्थिक अडचणीत सापडले होते…पण, यंदा गणेशोत्सव प्रत्येक कलाकाराला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मिळाले असून, उत्सव कलाकारांसाठी कमाईचा ठरत आहे.

रोज किमान दोन ते तीन कार्यक्रम कलाकार मंडळे सोसायट्यांमध्ये सादर करत असून, प्रत्येकाला कार्यक्रमांसाठी योग्य मोबदला मिळत आहे. लावणी महोत्सवापासून ते स्टँडअप कॉमेडीपर्यंत…नृत्य महोत्सवापासून ते एकपात्री प्रयोगांपर्यंत…आदी कार्यक्रमांमधून एका कलाकाराचे अर्थाजन होत आहे.

गेल्या दोन वर्षांत सण-उत्सवात कार्यक्रम नसल्याने कलाकारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला, पणयंदा लोककलेपासून ते शाहिरीच्या कार्यक्रमांपर्यंत…प्रत्येकाला चांगले बुकिंग मिळाले अन् आता गणेशोत्सवात मंडळांच्या ठिकाणी कलाकार मोठ्या उत्साहात सादरीकरण करताना दिसत आहेत.

सोसायटी, गणेश मंडळे अन् कंपन्यांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपली कला सादर करून दाद मिळवत आहेत. एक कलाकार रोज किमान दोन ते तीन कार्यक्रम सादर करत आहे. त्यामध्ये बोलक्या बाहुल्यांचे खेळ, एकपात्री प्रयोग, नृत्याचे कार्यक्रम, अभिवाचन, जादूचे प्रयोग, महिलांसाठीचे कार्यक्रम, कवी संमेलने अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

एका कार्यक्रमासाठी कलाकाराला किमान 5 ते 20 हजार रुपयांची कमाई होत आहे. यंदाच्या वर्षी तमाशा कलावंतांसाठी खास असून, गाव-जत्रांमध्ये तमाशाचे फड रंगत आहेत. तर पुण्यात विविध ठिकाणी लावणी महोत्सवही रंगत आहे. याशिवाय महाराष्ट्राची लोकधारा अन् लोककलेवर आधारित कार्यक्रमही लोकांची मने जिंकत आहेत. उत्सवात प्रत्येक कलाकारांना चांगला आर्थिक मोबदला मिळत आहे. पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, नाशिक, मुंबई, रत्नागिरी, नागपूर, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये कलाकार जाऊन सादरीकरण करत आहेत.

जादूगार जितेंद्र रघुवीर म्हणाले, निश्चितच यंदाचा उत्सव कलाकारांसाठी कमाईचा ठरत आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. मीही पुण्यासह राज्यभरात जादूचे प्रयोग सादर करत आहे. त्यासाठी मला योग्य आर्थिक मोबदलाही मिळत आहे. रोज किमान एक ते दोन कार्यक्रम सादर करीत आहे. माझ्यासोबत माझे सहकलाकारही सादरीकरण करत असून, प्रत्येकजण आनंदित आहे.

 

Back to top button