नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती | पुढारी

नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विसर्जन मिरवणूक मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धावपळ सुरू असली तरी हे कामकाज करताना ठेकेदारांकडून दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठेकेदारांकडून काम करण्याच्या नावाखाली पावसातच खड्डे बुजविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठेकेदारांना खड्डे बुजविण्यासाठी डेडलाइन ठरवून दिली आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने अशा स्थितीतही ठेकेदारांकडून काम केले जात असल्याने या कामाचा टिकाव कसा लागणार, असा प्रश्न केला जात आहे. भरपावसात सिटी सेंटर मॉलजवळील मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे पाऊस सुरू असतानाच बुजविले जात असल्याची तक्रार आहे. स्थानिक नागरिकांनी ठेकेदाराकडे तक्रार केली असता खड्डे बुजवित असताना अचानक पाऊस आल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरामधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. गेल्या वर्षी डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गणेश विसर्जनाच्या आधीच रस्ते दुरुस्तीचे निर्देश आयुक्तांनी अधिकारी व ठेकेदारांना दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. खड्डे बुजविल्याचा दावा बांधकाम विभागाने केला असून, नाशिक पश्चिम विभागांतर्गत येणार्‍या सिटी सेंटर मॉलजवळील रस्त्यावरील खड्डे चक्क पावसातच बुजविल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर खड्डे बुजवत असतानाच अचानक पाऊस आल्याचा खुलासा ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. बांधकाम विभागानेदेखील त्यास दुजोरा दिला आहे.

पश्चिम विभागातील सिटी सेंटर मॉलचा रस्ता गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. खड्डे बुजवण्याचे काम सुरू असतानाच पाऊस आला. परंतु, काम करताना काही त्रुटी राहिल्यास त्या ठेकेदाराकडून पूर्ण करून घेतल्या जातील.
– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा, नाशिक

हेही वाचा :

Back to top button