बंगालच्या तरुणीने जिंकली गाढ झोपण्याची स्पर्धा! | पुढारी

बंगालच्या तरुणीने जिंकली गाढ झोपण्याची स्पर्धा!

कोलकाता : अनेकांची झोप कुंभकर्णीच असते. पडल्या पडल्या कितीही वेळ झोपण्याची हुकमी सवय अशा लोकांना असते. आता तर पश्‍चिम बंगालमधील एका तरुणीने याबाबतची ‘इंडियाज फर्स्ट स्लीप चॅम्पियनशीप’ नावाची स्पर्धाही जिंकली आहे. त्रिपर्णा चक्रवर्ती असे तिचे नाव. हुगळीच्या श्रीरामपूर येथील त्रिपर्णाने 4.5 लाख स्पर्धकांना पराभूत करून चांगल्या झोपेचा किताब पटकावला आहे. यासाठी तिला 6 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले आहे. एक एक लाख रुपयांचे सहा धनादेश तिला दिले गेले.

त्रिपर्णाने शंभर दिवस नऊ तास झोपण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमानंतर तिने सांगितले, ती रात्री जागायची आणि दिवसा झोपायची. तिला मिळालेल्या बक्षिसातून ती तिच्या आवडीच्या आणि गरजेच्या वस्तू खरेदी करणार आहे. ही स्पर्धा गादी बनवणार्‍या एका कंपनीने अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी 4.5 लाख लोकांनी अर्ज केले होते. त्यामधून पंधरा स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामधून केवळ चारजण अंतिम फेरीत आले.

त्रिपर्णाला एका वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेची माहिती मिळाली. तिने सांगितले की या स्पर्धेसाठी चारही स्पर्धकांना एक मॅट्रेस (गादी) आणि स्लीप ट्रॅकर देण्यात आला होता. या सर्वांना झोपण्याचे कौशल्य दाखवण्यास सांगण्यात आले होते. त्रिपर्णा अमेरिकेतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. सध्या ती घरातूनच काम करीत आहे. त्यासाठी तिला रात्री जागावे लागते. दिवसभर झोपून ती रात्रीच्या झोपेची कमतरता पूर्ण करते.

Back to top button