

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर शहराच्या उत्तरेस असलेल्या बिल्वतीर्थ तलावाजवळच्या वस्तीवर बिबट्या वावरत असल्याने येथे दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे यशवंत भोये यांच्या वस्तीवर येत बिबट्याने चार कोंबडया फस्त केल्या. विशेष म्हणजे पुन्हा पहाटे बिबट्याच्या दर्शनाने रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
तलावाच्या पाठीमागे असलेल्या लग्नस्तंभ गंगाद्वार परिसरातून यापूर्वी बिबट्या येत होता. परंतु आता त्याने थेट तलावाच्या मुख्य रस्त्यावरून वावर सुरू केला आहे. पहिल्यांदा रात्री येत त्याने चार कोंबड्या पळविल्या आणि नंतर पुन्हा पहाटे येत कुत्र्याचे पिलू पळवले. यशवंत भोये आणि अन्य काही रहिवाशांनी प्रसंगावधान राखत फटाके वाजवताच बिबट्याने धूम ठोकली. काही दिवसांपासून बिबट्या येत असल्याचे लक्षात आल्याने फटाके वाजवण्याची तयारी केलेली होती.
बुधवारी याची माहिती मिळताच वन अधिकारी निंबेकर, भुजबळ यांसह पथकाने येथे येऊन पाहणी केली. त्यांनी बिबट्याच्या पायाच्या ठशांचे अवलोकन केले. जवळच असलेल्या गोकुळ कोरडे यांच्या घराबाहेर पडवीतदेखील ठसे आढळून आले आहेत. बिल्वतीर्थ तलावाच्या बाजूने असलेल्या रिंग रोडने रात्री-अपरात्री प्रवासी ये-जा करतात. या भागात काही आश्रम आहेत. तेथेही भक्त येत असतात. बिबट्याचा वावर वाढल्याने त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. बिबट्यामुळे सकाळ-सायंकाळी फिरायला जाणारे नागरिक आता बंद झाले आहेत.
दरम्यान, वनधिकारी निंबेकर यांनी रहिवाशांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. यामध्ये सायंकाळी मिरचीचा धूर करणे, घराबाहेर विजेचा बल्ब लावणे, फटाके वाजवणे यांसारखे खबरदारीचे उपाय अवलंबिण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, घराबाहेर अंगणात रात्री झोपणे टाळावे, असे आवाहनही केले आहे.