नाशिक : शहरात अवघ्या पाच महिन्यांत 1,174 जलवाहिन्यांना गळती | पुढारी

नाशिक : शहरात अवघ्या पाच महिन्यांत 1,174 जलवाहिन्यांना गळती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुनाट अन् जीर्ण झालेल्या जलवाहिनी गळतीचे प्रकार सातत्याने समोर येत असून, अवघ्या पाचच महिन्यांत शहरातील 1,174 जलवाहिनी गळतीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सिडको विभाग आघाडीवर असून, या भागात पाच महिन्यांत 369 जलवाहिन्यांची गळती झाली आहे. विशेष बाब म्हणजे या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीवर महापालिकेने आतापर्यंत 75 लाखांचा खर्च केला आहे. मात्र, अशातही जलवाहिन्या गळतीच्या घटना समोर येत असून, त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

नाशिक शहरात गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच मुकणे आणि दारणा धरणांतूनदेखील काही प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमधून येणार्‍या पाण्यांवर महापालिकेच्या सात जलशुद्धीकरण केंद्रांत प्रक्रिया करून 113 जलकुंभांच्या माध्यमातून सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. शहरात प्रतिदिन सुमारे 540 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मुकणे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत थेट जलवाहिनी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात नाशिक पूर्व, पंचवटी व नवीन नाशिकमधील इंदिरानगर, वासननगर, चेतनानगर, दीपालीनगर या भागांत पाणीपुरवठा केला जातो. अनेक ठिकाणी जलवाहिन्या जीर्ण, जुन्या झाल्याने लिकेज होण्याचे प्रकार घडतात. रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज आदी कामे सुरू असताना अथवा विविध कंपन्यांमार्फत गॅस पाइपलाइन अथवा केबल टाकण्याची कामे सुरू असताना खासगी स्वरूपाची कामे सुरू असतानादेखील जलवाहिन्या फुटतात.

1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल 1,174 वेळा जलवाहिन्यांना गळती लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सातपूर विभागात त्र्यंबक रोडवर अमृत गार्डन परिसरात जलवाहिनी फुटल्याने सातपूर व नाशिक पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची घटना नुकतीच घडली होती. जलवाहिनी गळतीची घटना समजल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे ती तत्काळ दुरुस्त केली जाते. यामुळे मात्र परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. जलवाहिनी दुरुस्तीसाठी गेल्या पाच महिन्यांत 75 लाखांचा खर्च झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांसाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सहाही विभागांत गळती
जलवाहिन्यांच्या गळतीत शहरातील सहाही विभागांच्या तुलनेत सिडको आघाडीवर आहे. सिडकोत पाच महिन्यांत 369 वेळा जलवाहिनी गळतीचे प्रकार समोर आले आहेत. त्या पाठोपाठ पंचवटी 223, नाशिक पश्चिम 176, नाशिकरोड 171, सातपूर 147, तर नाशिक पूर्व विभागात 88 वेळा जलवाहिनी दुरुस्तीचे प्रकार घडले आहेत. गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत मे 2022 मध्ये सर्वाधिक 316 वेळा जलवाहिनी गळतीचे प्रकार घडले. त्या खालेखाल एप्रिल 259, जूनमध्ये 257, जुलैत 173, तर ऑगस्टमध्ये जलवाहिनी गळतीच्या 169 घटना समोर आल्या.

हेही वाचा :

Back to top button