नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार, नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची भेट

नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार, नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची भेट

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'मविप्र'च्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करताना संस्थेवर 60 कोटींचे कर्ज आणि इतर देणे 70 कोटी असे 130 कोटींचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना देतानाच, संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

मविप्र संस्थेच्या सर्व नूतन पदाधिकार्‍यांनी रविवारी (दि. 4) मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा. बाळासाहेब पिंगळे आदी उपस्थित होते.

पवार व भुजबळ यांच्या हस्ते मविप्र संस्थेचे नूतन सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी आदींसह संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सयाजी गायकवाड, रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, संदीप गुळवे, अमित पाटील, डॉ. प्रसाद सोनवणे, रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णा भगत, विजय पगार, रमेश पिंगळे, सनदी लेखापाल राजाराम बस्ते, विजय गडाख, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

दीड कोटीचा निधी जमा
'मविप्र'च्या कर्जमुक्तीसाठी कार्यकारिणी मंडळाने विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून एक कोटीची देणगी जाहीर केली. त्यानंतर भुजबळ, बनकर, कोकाटे यांनी प्रत्येकी 5 लाख, तर सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे व देवीदास पिंगळे आणि विश्वस्तांनी प्रत्येकी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्यामुळे काही मिनिटांमध्ये दीड कोटींचा निधी जमा झाला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news