ग्रीनलँडच्या जॉम्बी बर्फाने वाढतेय समुद्राची पातळी | पुढारी

ग्रीनलँडच्या जॉम्बी बर्फाने वाढतेय समुद्राची पातळी

लंडन : ग्रीनलँडमधील बर्फाची चादर वेगाने वितळत आहे. हाच वेग कायम राहिला, तर भविष्यात समुद्राची पातळी 10.6 इंचांनी वाढू शकते. याचे प्रमुख कारण म्हणजे जॉम्बी बर्फ असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

‘नेचर क्‍लाईमेट चेंज’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार समुद्राच्या वाढत्या पातळीस जॉम्बी बर्फच जबाबदार ठरत आहे. यासंदर्भात माहिती अशी की, ग्रीनलँडमध्ये एक बेट असून ते आर्क्टिक आणि अटलांटिक महासागराने वेढले आहे. तेथील पाणीपातळी जॉम्बी बर्फाने वाढू लागली आहे.

जॉम्बी आईस अथवा डेड आईस म्हणजे हा मृत बर्फ दिसण्यात अन्य बर्फासारखाच असतो; पण आपल्यावर दुसर्‍या बर्फाचा थर जमा होऊ देत नाही. याशिवाय हा मृत बर्फही सध्या वेगाने वितळत आहे. याचे दोन प्रकारे परिणाम पाहावयाला मिळू शकतात. यातील पहिले म्हणजे सातत्याने हा बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढू शकते आणि दुसरे म्हणजे मृत बर्फावर नव्या बर्फाचा थर साचू न शकल्याने स्थिती आणखी बिघडणार आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ध्रुवीय भागातील बर्फाची चादर वेगाने वितळत चालली आहे. यामुळे समुद्राची पातळीही वाढू लागल्याने जगभरात किनारी वसलेली अनेक शहरे, गावे समुद्रात गडप होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका वेळीच टाळण्यासाठी तमाम देशांनी ग्लोबल वॉर्मिंगवर ठोस उपाय अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे विशेषज्ञांचे मत आहे. असे झाले, तरच ध्रुवीय भागातील बर्फाची चादर अबाधित राहणार आहे.

Back to top button