

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
जुन्या वादातून दोन महिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न अमळनेर तालुक्यातील तरवाडे येथे घडली असून मारवड पोलीस स्थानकामध्ये संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सदाशीव पाटील यांनी फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ संदीप सदाशिव पाटील याने शरद उखा पवार व अलका शेळके-मोरे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी शरद व विनोद पवार यांनी संदीप यांच्या पत्नीला गाव दरवाजाजवळ अडवत आमच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
जमावाने केली मारहाण…
धमकाल्यानंतर विनोद पवार, नितीन पवार, रूपाबाई पवार, शरद पवार, उखा पवार, विमलबाई पवार (सर्व रा. तरवाडे) तसेच रातीलाल पाटील, हर्षल रतीलाल पाटील व प्रमोद पाटील (रा. पिंपळे) हे घटनास्थळी आले. त्यांच्याकडे लाठ्या व लोखंडी रॉडसह हातात पेट्रोलची कॅन होती. या कॅनमधून पेट्रोल काढून त्यांनी फिर्यादीची आई व वहिनी यांच्या अंगावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर संदीप पाटील यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली. याप्रसंगी मदतीसाठी आलेल्या सतीश पाटील याला देखील मारहाण करण्यात आली. या वादामध्ये संदीप व सतीश दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
यांच्याविरुध्द गुन्हा दाखल…
याप्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात विनोद पवार, नितीन पवार, रूपाबाई पवार, शरद पवार, उखा पवार, विमलबाई पवार, (सर्व राहणार तरवाडे, ता. अमळनेर), रतिलाल पाटील, हर्षल पाटील आणि प्रमोद पाटील (सर्व रा. पिंपळे, ता. अमळनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे हे करीत आहेत.