चक्‍क विमानापेक्षाही अधिक वेगवान ट्रेन | पुढारी

चक्‍क विमानापेक्षाही अधिक वेगवान ट्रेन

टोरांटो : कॅनडाच्या एका कंपनीने पूर्णपणे इलेक्ट्रिक ट्रेनसारख्या अत्यंत वेगवान वाहनाचे अनावरण केले आहे. या वाहनातून ताशी 1000 किलोमीटर वेगाने प्रवास करता येऊ शकतो. ‘ट्रान्सपॉड’ नावाच्या या कंपनीचा दावा आहे की विमानापेक्षाही कमी दराच्या तिकिटात यामधून विमानापेक्षाही अधिक वेगाने प्रवास करता येईल. या वाहनाचे नाव ‘फ्लक्सजेट’ असे आहे.

ही एक ‘प्लेन-ट्रेन हायब्रीड’ आहे. हायपरलूपच्या संकल्पनेशीही ही ट्रेन जुळणारी आहे. या फ्लक्सजेटलाही एका प्रोटेक्टेड ट्यूबमधून म्हणजे विशेष प्रकारे तयार करण्यात आलेल्या सुरक्षित भुयारातून वेगाने चालवले जाते. त्याचे पॉडस् चुंबकीय रूपाने व्हॅक्यूम ट्यूबमध्ये वर उचलले जातात आणि त्यामुळे त्याला वेगाने धावण्याची क्षमता मिळते.

काही प्रमुख शहरांच्या व स्टेशन्सच्या दरम्यान ही ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. सुरुवातीला कॅनडाच्या कॅलगरी व अ‍ॅडमॉन्टर शहरांदरम्यान ही ट्रेन सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 300 किलोमीटरच्या अंतरासाठी 18 अब्ज डॉलर्सची योजना प्रस्तावित आहे. ही ट्रेन विमानापेक्षाही वेगवान आणि हायस्पीड ट्रेनपेक्षा तिपटीने अधिक वेगवान आहे. यावर्षीच्या सुरुवातीलाच ‘ट्रान्सपॉड’ने घोषणा केली होती की कंपनीला 550 दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळाला आहे.

ही योजना अद्याप संशोधन आणि विकासाच्या टप्प्यात आहे. कंपनी सध्या पर्यावरण मूल्यांकन आणि भूमी अधिग्रहणावर लक्ष केंद्रीत करीत आहे. ट्रान्सपॉडचे सहसंस्थापक आणि सीईओ सेबेस्टियन गेंड्रोन यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात एडमॉन्टन विमानतळापासून 2023 च्या अखेरपर्यंत सुरुवात केली जाईल.

2027 मध्ये कॅलगरीशी त्याला जोडण्यात येईल. ‘ट्रान्सपॉड’च्या माहितीनुसार फ्लक्सजेटमधून एकावेळी 54 प्रवासी आणि 10 टन कार्गोसह प्रवास होऊ शकतो. प्रवासात ट्रेन प्रत्येक दोन मिनिटाला एका स्टेशनवर थांबेल. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीत घट होईल. तसेच कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात 6,36,000 टन प्रति वर्ष घट होईल. कंपनीचा दावा आहे की फ्लक्सजेटचे तिकीट हे विमानाच्या तिकिटापेक्षा 44 टक्के स्वस्त असेल.

Back to top button