नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली ; बोडका बंधारा तुडुंब भरला | पुढारी

नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली ; बोडका बंधारा तुडुंब भरला

नाशिक (नांदूरशिंगोटे)  : पुढारी वृत्तसेवा
दापूर येथे गुरुवारी (दि. 1) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक शेतकर्‍यांची शेती वाहून गेली. भाजीपाला पिकांची नासाडी झाली तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

ढगफुटीमुळे परिसरातील छोटे-मोठे बंधारे फुटल्याने हे पाणी बोडके बंधार्‍यात आले. बंधारा तुडुंब भरल्याने पाण्याची पातळी वाढल्याने अखेरीस दक्षता म्हणून रात्रीच या परिसरातील लोकांना व जनावरांना स्थलांतरित करण्यात आले. आजुबाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मात्र पाणी जास्त आल्यामुळे परिसरातील शेतामध्ये घुसले. त्यामुळे शेतामध्ये असलेले टोमॅटो, वालवड, सोयाबीन, कांद्याची रोपे वाहून गेली. यामुळे या परिसरातील 35 ते 40 शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असून सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गावातील नागरिकांना सावधानतेचा पवित्रा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला. सामाजिक कार्यकर्ते योगेश आव्हाड यांनी रात्री तहसीलदार सागर मुंदडा यांच्याशी फोनवर संपर्क साधून पूर परिस्थितीची माहिती देण्यात आली. तहसीलदार मुंदडा यांनी पंचनामे करण्याचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना आदेश दिले. रामनाथ आव्हाड, पोपट आव्हाड, प्रकाश आव्हाड, गोविंद आव्हाड, शंकर आव्हाड, अशोक आव्हाड, विठ्ठल आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, सखाराम साबळे, वासुदेव आव्हाड, शांताराम आव्हाड, पांडुरंग आव्हाड, भिकाजी आव्हाड आदी शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरपंच सोमनाथ आव्हाड, उपसरपंच संजय बोडके, पोलिसपाटील ज्ञानेश्वर साबळे, योगेश आव्हाड, नवनाथ आव्हाड, निवृत्ती बेदाडे, अशोक शिंदे, दत्तात्रय आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, योगेश तोंडे, म्हाळू गामणे, समाधान आव्हाड, राजेंद्र आव्हाड आदींनी परिसराची पाहणी केली.

हेही वाचा:

Back to top button