आली गवर आली…सोनपावली आली…

आली गवर आली…सोनपावली आली…
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा भाद्रपदातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आगमन झाले. महिलांकडून 'गौराई गौराई कशाच्या पायी.. धनधान्याच्या, सोन्या मोत्याच्या, हळदी-कुंकाच्या, आरोग्याच्या पायी..' अशा पारंपारिक गीतांच्या गजरात गौरींचे उत्साहात स्वागत केले. गौराईंचा कौतुक सोहळा पुढील तीन दिवस चालणार असल्याने अवघ्या महिला वर्गामध्ये आनंदाला उधाण आले आहे.
लाडक्या बाप्पांपाठोपाठ शनिवारी ज्येष्ठा गौरींचे घरोघरी आगमन झाले. महिला सन्मानाचा सण असल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण होते. तुळशीजवळ भक्तीभावाने पूजन करुन सुवासिनींच्या मेळ्यात ज्येष्ठा गौरींचे घरोघरी स्वागत करण्यात आले.

'गौराई गौराई कशाच्या पायी.. धनधान्याच्या, सोन्या मोत्याच्या, हळदी-कुंकाच्या, आरोग्याच्या पायी..' अशा पारंपारिक गीतांच्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली. भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. आज पुरणपोळीसह विविध पदार्थांचा महानैवेद्य तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. सरबराईसाठी विविध मिठाई, फळांची आरास करुन सुख, समृध्दी व आरोग्यासाठी गौराईंना साकडे घालण्यात येणार आहे. गौरींचे आगमन, जेवण व विसर्जन असा तीन दिवस हा कौतुक सोहळा चालणार आहे. एकूणच गौराईंचा सण म्हणजे महिलांचा सन्मान सोहळाच घरोघरी साजरा होत आहे. त्यामुळे अवघ्या महिला वर्गाच्या आनंदाला उधाण आले आहे. महिलांच्या आनंदाचा हा झरा आणखी दोन दिवस असाच खळखळत राहणार आहे.

रानभाज्यांना नैवेद्याचा मान…

गौरी-गणपतीचा सणात वातावरणानुसार आरोग्यासाठी लाभदायी रानभाज्यांना नैवेद्यामध्ये विशेष मान दिला जातो. आधी येवून गेलेल्या श्रावणधारांमुळे निसर्ग बहरुन येतो. त्यामुळे केवळ पावसाळ्यातच येणार्‍या रानभाज्याही उपलब्ध असून त्यांचे सेवन करणे हितकारक असते. त्यामुळे गौरीच्या स्वागत समारंभात आगाडा, तगर, हादगा, झेंडू, माका यांसह आठ वनस्पतींच्या पान-फुलपत्रींना विशेष महत्व दिले जाते. तसेच नैवेद्यामध्ये शेपू, तांदळी, तांबड्या भोपळा अशा रानभाज्यांचा समावेश असतो.

हळदी-कुंकू व सजावट स्पर्धांना बहर

तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त सण साजरा होत असल्याने यावर्षी गौरींच्या हळदी-कुंकू व सजावट स्पर्धांना बहर आला आहे. सातारा शहरात चौकाचौकात आयोजकांकडून फलक लावून नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचल्याने सणाचा निखळ आनंदाची जागा चढाओढीने घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news