नाशिक : परिस्थिती हालाखीची म्हणून पोटच्या मुलीला 50 हजार रुपयांना विकलं, मुलीने 'असा' काढला पळ
जळगाव : कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने आपल्या पोटच्या मुलीची ५० हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात उघडकीस आला आहे. जन्मदात्यांनीच भुसावळातील एका दाम्पत्याला घर कामासाठी ५० हजारात या मुलीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाम्पत्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील कुटुंबियांनी आपली जेमतेम परिस्थिती असल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची भुसावळातील सिंधी कॉलनीतील अठवाणी दाम्पत्यास ५० हजारात विक्री केली होती. मात्र, अठवाणी दाम्पत्याकडून या चिमुकलीचा अमानुष छळ करून तिला बेदम मारहाण केली जात होती. आपल्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ही मुलगी निमुटपणे छळ सहन करत होती. मात्र, सतत होणारा त्रास असह्या झाल्याने चिमुकलीने पळ काढून पोलीस ठाणे गाठत आपल्या छळाची माहिती दिली. यानंतर नरेश अठवाणी व राधा अठवाणी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई-वडिलांना भेटण्यास मनाई
पीडीत मुलीने अठवाणी दाम्पत्याकडे आपल्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी भेटू देण्यास मनाई केली. तर शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी स्नानगृह स्वच्छ न केल्याने राधा अठवाणी यांनी अमानुष मारहाण केली होती. त्यामुळे पीडीत मुलीने कशीबशी सुटका करून घेत घरातून पळ काढला. भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर नरेश अठवाणी आणि राधा अठवाणी (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस उपनिरीक्षक हरीष भोये हे करत आहेत.