औरंगाबाद : सर्वत्र धुवाधार, सिल्लोड तालुका मात्र कोरडाच | पुढारी

औरंगाबाद : सर्वत्र धुवाधार, सिल्लोड तालुका मात्र कोरडाच

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : राज्यासह जिल्ह्यात बहुतांश भागात समाधानकारक तर काही ठिकाणी धुवाधार पाऊस झाला. मात्र सिल्लोड तालुक्यात सरासरी एवढा पाऊस पडूनही केळगाव प्रकल्प वगळता उर्वरित प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. यात शहरासह बारा- पंधरा गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या खेळणा प्रकल्पात अवघा 36 टक्के पाणी साठा आहे. चारनेर- पेंडगाव प्रकल्प अद्यापही जोत्याखालीच आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी 477 मि. मी. पाऊस झाला असून बहुतांश जलसाठ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

तालुक्यात पेरणीवेळी दमदार पाऊस झाल्याने नदी- नाल्यांना पूर आला होता. त्यानंतर मात्र पिकांना पुरता पाऊस पडत राहिल्याने जलसाठ्यांमध्ये आवक झालीच नाही. परिणामी पावसाळा लागून तीन महिने झाले तरी जलसाठ्यांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. पावसाचा हा अखेरचा महिना आहे. या महिन्यात दमदार पाऊस झाले नाही, तर जलसाठ्यांचा पाणीसाठा जैसे थे राहील. परिणामी फेब—ुवारी- मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

तालुक्यात सरासरी एवढा पाऊस पडूनही खेळणा प्रकल्पात 36 टक्के, चारनेर- पेंडगाव जोत्याखाली, केळगाव 100 टक्के, अजिंठाअंधारी 23, उंडणगाव 12, रहिमाबाद जोत्याखाली, निल्लोड 22 तर हळदा प्रकल्पात 49 टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यात बुधवारी तब्बल तेवीस दिवसांच्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले. पावसाने मोठा खंड दिल्याने खरिपाची पिके करपत होती. बुधवारी व गुरुवारी काही भागांत तर दुपारी काही भागात रात्री मध्यम पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाचे पुनरागमन झाले असले तरी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

477 मि. मी. पाऊस तालुक्यात आतापर्यंत सरासरी 477 मि. मी. पाऊस झाला असून यात सर्वाधिक अंभई मंडळात 655 मि. मी. तर सर्वात कमी निल्लोड मंडळात 394 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सिल्लोड मंडळात 462 मि. मी., भराडी 424, अजिंठा 515, गोळेगाव खु. 471, आमठाणा 482, तर बोरगाव बाजार मंडळात 415 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या दोन- तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाची मेहेरबानी जेमतेमच राहिली.

तीन वर्षांच्या तुलनेत घटले प्रमाण

गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यातच पाऊस सरासरी ओलांडत होता. परिणामी बहुतांश जलसाठे याच महिन्यात ओव्हरफ्लो होत ओसंडून वाहत असल्याने छोटे- मोठे नदी- नाले मनसोक्त वाहत होती. यंदाही 15 ऑगस्टदरम्यान पावसाने सरासरी ओलांडली होती. मात्र दमदार पाऊस न झाल्याने जलसाठ्यांमध्ये आवक झाली नाही.

Back to top button