जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला | पुढारी

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गावठाण जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कजगाव येथील रहिवासी भूषण नामदेव पाटील या तरूणाने शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. भूषण पाटील हा कजगाव येथील रहिवासी असून गावातील बस स्थानकासमोर असलेल्या गावठाण गट क्रमांक १३१ समोरचे अतिक्रमण काढण्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. या संदर्भात त्याने अनेकदा निवेदने देऊन देखील स्थानिक ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही. या संदर्भात कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा भूषण पाटील याने दिला होता.

या अनुषंगाने शुक्रवारी (दि २) सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास भूषण नामदेव पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:च्या अंगावर पेट्रोलच्या पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Back to top button