पुणे-सोलापूर हायवेवरील दरोड्यातील आणखी मोठे घबाड ग्रामीण पोलिसांच्या हाती, अटक केलेल्या तिघांकडून मिळाले 2 कोटी 1 लाख | पुढारी

पुणे-सोलापूर हायवेवरील दरोड्यातील आणखी मोठे घबाड ग्रामीण पोलिसांच्या हाती, अटक केलेल्या तिघांकडून मिळाले 2 कोटी 1 लाख

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंगडीयाच्या गाडीवर गोळीबार करत दरोडा टाकून तब्बल 3 कोटी 60 लाख रुपयांची रोकड लुटल्यानंतर तिघांकडून 1 कोटी 43 लाखांची रोकड ग्रामीण पोलिसांनी जप्त केली होती. त्यातच राजस्थान येथे पळून गेलेल्या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडेही इंदापूर पोलिसांना मोठे घबाड सापडले आहे. त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 1 लाख 10 हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून आतापर्यंत दरोड्यातील 3 कोटी 44 लाख 30 हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. गौतम अजित भोसले (33, रा. वेने, म्हाडा, जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (26) आणि भूषण लक्ष्मीकांत तोंडे (25, दोघही रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याकडून 2 कोटी 1 लाख 10 हजारांची नव्याने रोकड जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेल्या सागर शिवाजी होनमाने (वय 34), बाळु उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय 32, राहणार दोघे कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रजत अबू मुलाणी (वय 24, रा. न्हावी, ता. इंदापुर) या कुर्डूवाडी परिसरात ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्याकडील तपासात पोलिसांनी तब्बल 1 कोटी 43 लाख 20 हजारांची दरोडा टाकलेली रोकड जप्त केली होती.

यामध्ये सागर होनमाने यांच्याकडून 72 लाख, रजत मुलानी याच्याकडून 71 लाख 20 हजार, गौतम भोसले कडून 71 लाख 60 हजार, किरण घाडगे कडून 60 लाख तर भूषण तोंडे याच्याकडून 69 लाख 50 हजार अशी एकूण 3 कोटी 44 लाख 30 हजारांची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व इंदापुर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कुर्डूवाडी व राजस्थान येथील उदयपूर परिसरातून जेरबंद केले होते. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना इंदापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केले असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 26 ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास इंदापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरकुटे पाटी पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर हा 3 कोटी 60 लाखांचा दरोडा टाकण्यात आला होता. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणावरून सुरूवातीला सागर, बाळू आणि रजत या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. नंतर राजस्थानात पळून गेलेल्या तिघांना आता अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांचे पथक तपास करत आहेत.

गुन्ह्यात दरोडा टाकण्यात आलेली 15 लाख 70 हजारांची रोकड अद्यापही आरोपींकडून जप्त करायची आहे. त्यांनी त्या रकमेचा कोठे उपयोग केला. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? अंगडीयांच्या गोटातून नेमकी कोणी माहिती लिक केली याचाही तपास सध्या इंदापूर पोलिस करत आहेत.

Back to top button