नाशिक : ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे निधन | पुढारी

नाशिक : ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे निधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बँकिंग, शैक्षणिक, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नेते भास्करराव बोरस्ते यांचे बुधवारी (दि.31) वृद्धापकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथे राहणारे भास्करराव बोरस्ते यांनी माध्यमिक शिक्षणानंतर बीवायके कॉलेज येथे पदवीचे शिक्षण घेतले.

स्वतःच्या उदरनिर्वाहाचा भाग म्हणून त्यांनी प्रारंभी न्यू नाशिक प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती. या प्रिंटिंग प्रेसचा विस्तार करून अशोकस्तंभ, मल्हार गेट पोलिस चौकी येथे स्वतंत्र प्रिंटिंग प्रेस सुरू करून नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून यश संपादन केले. नाशिक जिल्ह्यातील सर्वांत जुनी असलेली नाशिक पीपल्स को-ऑप बँक अडचणीत आलेली असताना त्यांच्या व रमेश केंगे यांच्या नेतृत्वाखाली त्या बँकेवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले. सुमारे 20 वर्षे ते या बँकेवर संचालक होते. काही वर्षे अध्यक्षही राहिले. भास्करराव बोरस्ते यांनी अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचे काम केले. त्यांची राजकीय परंपरा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजय बोरस्ते हे 20 वर्षांपासून समर्थपणे चालवत आहेत. उपमहापौर, शिवसेना गटनेते, विरोधी पक्षनेता, शिवसेना महानगरप्रमुख ही पदे अजय बोरस्ते यांनी भूषवून ते आज राजकारणात सक्रिय आहेत. भास्करराव बोरस्ते गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातू, नाती असा परिवार आहे. नाशिक अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे भगीरथ शिंदे, चिंतामण सोनवणे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, आमदार माणिक कोकाटे, आमदार देवयानी फरांदे, दिलीप बनकर, मविप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्ययात्रेस नाशिकमधील सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पक्षांचे प्रमुख, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिकचे उपनगराध्यक्षपद भूषविले
राजकारणाची आवड असल्याने भास्करराव बोरस्ते यांनी तत्कालीन वॉर्ड क्र. 16 मधून 1974 मध्ये नाशिक नगरपालिकेची निवडणूक लढवली. डॉ. वसंतराव गुप्ते नगराध्यक्ष असताना त्यांनी उपनगराध्यक्ष पद भूषवून कामाचा ठसा उमटविला. त्यांनी नगरसेवक मित्रांचा गट तयार केला. माजी खासदार डॉ. प्रताप वाघ यांची निवडणूक प्रामुख्याने भास्करराव बोरस्ते आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांच्या मदतीने विजयश्री खेचून आणली.

हेही वाचा:

Back to top button