भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे तर ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे : देवेंद्र फडणवीस | पुढारी

भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे तर ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे : देवेंद्र फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे तर ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली. श्री क्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस हे अखिल भारतीय महानुभाव संमेलनानिमित्ताने मंगळवारी (दि.30) नाशिक येथे आले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे बारामती मतदारसंघातून राज्यव्यापी दौर्‍याचा प्रारंभ करणार आहेत. त्यामुळे भाजपचे ’मिशन बारामती’ अशी चर्चा असल्याबद्दल ना. फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपने ’मिशन बारामती’ नव्हे तर ’मिशन महाराष्ट्र’ हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. ऋद्धपूर येथे मराठी भाषेतील सहा हजार ग्रंथांची निर्मिती झाली. त्याठिकाणी मराठी भाषा विद्यापीठासह परिसराच्या विकासासाठी गेल्या पंचवार्षिकमध्ये 298 कोटींच्या आराखड्याला मान्यता दिली होती. त्यासाठी समिती गठीत करून अंतिम अहवालही आला. मात्र, राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर मागील अडीच वर्षांतील सरकारने ऋद्धपूरला योग्य तो न्याय दिला नसल्याची टीका ना. फडणवीस यांनी केली. राज्यात आता भाजप-शिवसेनेचे आमचे सरकार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा करून या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची घोषणा ना. फडणवीस यांनी केली. दरम्यान, मुंबईत सोमवारी (दि.29) रामदेवबाबा यांच्याशी झालेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे भेटीचे ‘राज’ गुलदस्त्यात :

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी (दि.29) ना. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत ना. फडणवीस यांना विचारले असता तुम्ही काहीही पतंगबाजी कराल आणि मी थोडीच उत्तर देणार, असे सांगत त्यांनी अधिकचे भाष्य करणे टाळले.

हेही वाचा :

Back to top button