नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक | पुढारी

नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काही दिवसांपासून सातपूर परिसरात पाण्याची तीव— टंचाई असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. आता या प्रश्नी शिवसेना आक्रमक झाली असून, लवकर हा प्रश्न मार्गी न लावल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहे.

चार-पाच दिवसांपासून सातपूर परिसरात पाण्याची तीव— टंचाई जाणवत आहे. सध्या परिसरात खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, नागरिक पाण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. अवाच्या सवा दर आकरून खासगी टँकरवालेही हात धुऊन घेत आहेत. दरम्यान, काही नागरिकांनी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांच्याकडे तक्रार करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असता, तत्काळ आयुक्तांशी फोनवरून संवाद साधत सातपूरकरांच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडण्यात आल्या. तसेच आयुक्तांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, पाणीपुरवठा खंडित झाला आहे. दुरुस्तीचे काम 48 तासांच्या आत होणे अपेक्षित होते. मात्र, मनुष्यबळाअभावी कामाला उशीर होत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकारी चव्हाणके, धारणकर यांना आयुक्तांनी सूचना देत तत्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होईल, असे आश्वासनही दिले आहे. यावेळी बडगुजर आणि शिंदे यांनी कायमस्वरूपी उपाय म्हणून संपूर्ण जलवाहिनी ‘एमएस’मध्ये रूपांतरित करण्याची विनंती आयुक्तांना केली आहे. याप्रसंगी उपमहानगरप्रमुख देवा जाधव, गोकुळ निगळ, सुनील मौले, धीरज शेळके, समाधान देवरे, योगेश गांगुर्डे, विजय वाडेकर, अलका गायकवाड, गोकुळ तिडके, मनोज चव्हाण, सुभाष गुंबाडे, दीपक नागरे, अनिल मौले, जगन डंबाळे, अंकुश खताळे, प्रकाश खैरनार उपस्थित होते.

 हेही वाचा :

Back to top button