

नाशिक / सातपूर : पुढारी वृत्तसेवा
काल नाशिकच्या अंबड येथील मधुर डेअरी अॅण्ड डेलिनीड्स आणि म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म या कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी धाड टाकत 12 लाखांचे बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले. या कारवाईमुळे भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच हे बनावट पनीर नेमकं कसं बनवतात व ते ओळखायचं कसं असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
अंबड येथील मधुर डेअरी अॅण्ड डेलिनीड्स या कारखान्यावर जेव्हा धाड टाकण्यात आली, तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट पनीर आढळून आले. विशेष म्हणजे हा कारखाना अनधिकृतपणे चालविला जात होता. कारखान्यासाठी अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवानादेखील काढण्यात आलेला नव्हता. जेव्हा कारखान्यावर धाड टाकण्यात आली, तेव्हा आप्पासाहेब हरी घुले (39) हा विक्रेता म्हणून त्या ठिकाणी हजर होता. या कारखान्यात विनापरवाना बनावट पनीर हे रिफाइंड पामोलीन तेलाचा वापर करून बनावटरीत्या तयार केले जात असल्याचे आढळून आले. यावेळी अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी विक्रेता आप्पासाहेब घुले याुच्याकडून पनीर, सिटिक सिड, रिफाइंड पामोलीन तेल आणि तूप असा एकूण दोन लाख 35 हजार 796 रुपये किमतीचा साठा जप्त केला. तर म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म या आस्थापनेवर धाड टाकली असता, या ठिकाणी आनंद वर्मा (50) नामक व्यक्ती आढळली. त्याची विचारपूस केली असता, विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे सांगितले.
बनावट पनीर बनवण्याचा अजब प्रकार आहे. पनीर बनविण्यासाठी मुख्यत्वे दुधाचा वापर केला जातो. मात्र, काही भामटे दुधातील पोषक तत्त्वे काढून झटपट श्रीमंती मिळवण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. हे भामटे दुधातील फॅट काढून, त्याची पावडर बनवितात. त्यानंतर ती पावडर पाण्यात मिसळून पांढरे पाणी तयार करतात. मात्र, या पाण्यात फॅट नसल्याने पनीर तयार होऊ शकत नाही. त्यासाठी या पाण्यात खाद्यतेल मिसळतात. खाद्यतेलातील फॅट यामध्ये टाकून तसेच एमएलसी फायर हा वैज्ञानिक प्रयोग करून बनावट पनीर तयार करतात. हे पनीर आरोग्यास घातक असते.
बनावट पनीर ओळखण्यासाठी 'किंमत' अत्यंत महत्त्वाची ठरते. कमी किमतीत पनीर मिळत असेल तर ते बनावट असू शकते. त्याचबरोबर पनीर घेताना नेहमी चांगल्या कंपनीचे तसेच पॅकिंग असलेले पनीरच खरेदी करावे. खुले पनीर खरेदी केल्यास, ते बनावट असू शकते.