रत्नागिरी : मलमपट्टी करा; पण रखडपट्टीचे काय? | पुढारी

रत्नागिरी : मलमपट्टी करा; पण रखडपट्टीचे काय?

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असतानादेखील कोकणचा हायवे बनला नाही हे दुर्दैव आहे. कोकण भूमीने देशाला सहा भारतरत्ने दिली. अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, समाज सुधारक दिले. त्यातून स्वातंत्र्याचा संग्राम लढला गेला. मात्र, कोकण भूमी विकासापासून कायमच वंचित राहिली आहे. शासन कोणाचे असो, मात्र कोकणला सातत्याने राजसत्तेने सापत्नतेची वागणूक दिली आहे. याचे उदाहरण म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने खड्डेमय महामार्गावर मलमपट्टी केली जात आहे. यातून कोकणवासी समाधानी नाहीत तर महामार्गाचे चौपदरीकरण मुदतीत होणार का? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने खड्डे भरले जातात आणि परतीच्या प्रवासात चाकरमान्यांना हेच खड्डे पुन्हा पडलेले दिसतात इतके तकलादू काम असते. गेली चौदा वर्षे हा वनवास सुरू आहे. तरीही कोकणची या वनवासातून मुक्तता झालेली नाही. सुदैवाने यावेळी कोकणचे सुपुत्र असलेले ना. रवींद्र चव्हाण हे बांधकाममंत्री लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. उखडलेल्या महामार्गावरील खड्डे भरण्याबरोबरच त्यांनी चौपदरीकरण तातडीने कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरण 99 टक्के पूर्ण झाले. मात्र, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ही टक्केवारी पन्नासच्याही मागे आले. हा रस्ता रखडण्यास राजकारण आहे की षड्यंत्र असा संशय आता कोेकणवासीय व्यक्त करीत आहेत. या संदर्भात अनेकवेळा उच्च न्यायालयात सुनावण्या झाल्या. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपन्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. रस्ते मार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत करणे ही संबंधित चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराची जबाबदारी आहे.

सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी योग्य नाही ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे मलमपट्टी करून गणपतीसाठी डेकोरेशन करण्यात येत आहेत. गणेशोत्सव, शिमगोत्सवासाठी महामार्गावरील खड्डे नेहमी बुजविले जातात. कोकणवासी याच महामार्गावरून वर्षभर ये-जा करीत असतो. महामार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन आता कोकणी माणूस कोकण रेल्वेकडे अधिक वळला आहे. मात्र, याही गाड्या परराज्यातील प्रवाशांनी आधीच आरक्षित झालेल्या असतात. यामुळे कोकणी जनतेची कुचंबणा होत आहे. कोकण रेल्वेमध्ये शिरायला जागा नाही आणि दुसर्‍या बाजूला महामार्गाची दुरवस्था अशा कात्रीत कोकणी माणूस बेजार झाला आहे.

गेल्या वर्षी तर कोकणात येणारे सर्व मार्ग बंद झाले होते. परशुराम घाट, कशेडी घाट, आंबा घाट, अणुस्कुरा घाट या ठिकाणी दरडी कोसळल्याने व ठिक़ठिकाणी घाट खचल्याने जिल्ह्यात येणारे मार्ग बंद झाले होते. यावर्षी कुंभार्ली व आंबा घाट सुरळीत आहे. परशुराम घाट दीड महिन्यांनी सुरू करण्यात आला आहे. मुंबई ते गोवा हा रस्ता सत्ताधार्‍यांच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहात आहे हा प्रश्न आहे. चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी आंदोलन केले आणि जनजागृती केली. अखेर शासनाने दखल घेतली. मात्र, चौदा वर्षांचा वनवास अजूनही संपलेला नाही. त्यामुळे गणराया आता तरी नव्या शिंदे सरकारला चौपदरीकरण मार्गी लावण्याची सुबुद्धी दे, असे साकडे घालण्याची वेळ आली आहे.

कोकणच्या वनवासामागे षड्यंत्र

आमच्या देवभूमीमध्ये गेली चौदा वर्षे जायला दर पावसाळ्यात आणि गणपतीमध्ये चांगला हायवे नाही हे आपले दुर्दैव आहे. पहिला दोन पदरी रस्ता होता तो चांगला होता असे म्हणायची आता वेळ आली आहे. यामागे एक षड्यंत्र पण आहे. त्यामुळे कोकणी लोक कोकण बाहेरून प्रवास करून कोकणांत येतात. परिणामी, त्या हायवेवरच्या व्यवसायिकांना मदत होते. आमचे कोकणातील पर्यटन व्यावसायिक आणि हायवे वरचे कोकणी तरुण व्यावसायिक व उद्योजक गेली चौदा वर्षे कायम अडचणीत आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात दर्जेदार आणि सुरक्षित हायवे बनला पाहिजे, यासाठी सर्वांनी सर्व पातळीवर प्रयत्न केले पाहिजे. कोकणाला कायम मागासले ठेवण्याच्या षड्यंत्रातून कोकणाला बाहेर काढणे आवश्यक आहे. अन्यथा उदासीनता सोडून कोकणातील माणसांना नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागेल.

-संजय यादवराव, कोकण भूमी प्रतिष्ठान

Back to top button