नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर | पुढारी

नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विवाह जुळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. इच्छुक वधू-वरांचे बायोडाटा दाखवण्याआधी पैशांची मागणी करणे व पैसे मिळाल्यानंतर बनावट बायोडाटा दाखवणे किंवा संपर्क तोडणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इच्छुक वधू-वरांसह पालकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

इंटरनेटच्या युगात बहुतांश कामे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. मुला-मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठीही पालक सोशल मीडिया, संकेतस्थळांचा वापर करताना दिसतात. त्यात अनेकदा व्यक्ती, संस्था सशुल्क ही सेवा पुरवत असतात. मात्र, याचा गैरफायदा काही भामटे घेताना आढळून येतात. आमच्याकडे तुमच्या मुला-मुलीस साजेसे स्थळ असल्याचा दावा करून पालकांना पैसे भरण्यास सांगतात. पैसे मिळाल्यानंतर हे भामटे ‘नॉट रिचेबल’ होतात किंवा न पटणारे स्थळ किंवा बनावट माहितीचे स्थळ देऊन संबंधित पालकांची बोळवण करताना दिसून येतात. याआधीही सोशल मीडिया किंवा संकेतस्थळावरून ओळखी करून विवाह करण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी इच्छुक वधूंची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे काही भामटे वैयक्तिक स्तरावर वधू-वरांची माहिती संकलित करून परस्पर ती माहिती अनोळखी व्यक्तींना देत असल्याचेही प्रकार घडत आहेत. यामुळे इच्छुक वधू-वरांच्या खासगी माहितीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा:

Back to top button