नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा, | पुढारी

नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : टीम पुढारी वृत्तसेवा
यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा आहे, असे असतानाही शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सातपूर परिसरात मुख्य जलवाहिनीच फुटल्याने, तर गंगापूर रोडला अघोषित पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सातपूरला मनपासह मनसेने टँकरसेवा सुरू केली आहे. परंतु, सातपूरला सलग पाच दिवसांपासून पाणीटंचाई सुरू असल्याने टँकरसेवाही अपुरी पडत आहे. तर गंगापूर रोड परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे धाव घेत पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत सर्व भागांत टँकरसेवा पुरविण्याची मागणी केली आहे.

सातपूर : अमृत गार्डन हॉटेल चौकात महापालिकेची 1,200 मीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने सातपूरच्या रस्त्यांवर पाणीचपाणी झाले असून, नागरिकांच्या घरांमध्ये मात्र पाण्याचा थेंबही पोहोचत नसल्याने पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. शनिवार-रविवारच्या ड्रायडेनंतर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे वाटत असताना सोमवारी सायंकाळी अमृत गार्डन हॉटेल चौकात महापालिकेची 1,200 मीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने सातपूर परिसरातील अनेक भागांत पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवार ते बुधवार असे सलग पाच दिवस पाणी न आल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कामावर रोष व्यक्त केला. दरम्यान, अनेक ठिकाणी इच्छुकांनी नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. महापालिकेनेही सातपूर परिसरात अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवायचा प्रयत्न केला, परंतु सलग पाच दिवस पाणी न आल्याने सर्वच भागांपर्यंत मनपाची टँकरसेवा पोहोचू शकली नाही. सध्या फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी एप्रिल महिन्यातही कर्मचारी आले होते, त्यांना दुरुस्तीचे ठिकाणच न सापडल्याने आल्या पावली ते माघारी फिरले होते.

पंचवटी : नाशिक शहरात धो धो पाऊस पडत असताना गंगापूर रोडवरील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील डी. के. नगर, नृसिंहनगर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत माजी नगरसेविका स्वाती भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन निवेदन दिले व पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. डी. के. नगर, श्रमिक कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, विनय कॉलनी, श्रीरंगनगर, नक्षत्र कॉलनी तसेच नृसिंहनगर, सावरकरनगर आणि आकाशवाणी केंद्र परिसरात गेल्या चार दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना आणि विशेषतः महिलावर्गाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने या प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका भामरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची भेट घेतली. या परिसरात कोणतेही तांत्रिक कारण नसताना अचानक अघोषित पाणीकपात करण्यात येत असल्याबाबत माहिती दिली. तसेच आकाशवाणी केंद्र परिसरातील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर प्रस्तावित असलेल्या जलकुंभाचे काम तातडीने करण्याबाबतची मागणी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच पाणीटंचाई दूर होईपर्यंत या सर्व परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत सकारात्मकता दाखविली.

हेही वाचा :

Back to top button