नाशिक : चंगाई सभेच्या नावाखाली भोंदूगिरी; कारवाईची मागणी | पुढारी

नाशिक : चंगाई सभेच्या नावाखाली भोंदूगिरी; कारवाईची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चंगाई सभेच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या माध्यमातून असाध्य रोग बरे करण्याचा दावा करणार्‍या भोंदूवर जादूटोणा विरोधी कायदा व बोगस डॉक्टर विरोधी कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्षने केली आहे.

पेठेनगर, नाशिक येथे चंगाई सभेच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या माध्यमातून अज्ञानी, अगतिक, असाध्य रोगाने पिडलेल्या व्यक्तींना फसवून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असलेल्या भोंदूगिरीचा प्रकार जागृत नागरिकांनी उघडकीस आणला. त्याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात संबंधित भोंदूविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनही दिले आहे. भोंदूबुवाची सखोल चौकशी करून त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना त्याने अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय पद्धतीने आत्तापर्यंत किती पीडितांवर इलाज केले, कधीपासून तो इलाज करीत आहे, कशाप्रकारे इलाज करतो, त्यात किती लोक फसले गेले, त्यातून लोकांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याशी त्याने कसा खेळ केला, त्यास सहकार्य करणारे कोण अशा विविध अंगाने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

धर्मांतराबाबतही चौकशी करा 
नागरिकांना पटेल, आवडेल तो धर्म स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, बळजबरीने कुणी कुणाला धर्मांतर करण्याची सक्ती करू शकत नाही. मात्र, हा भोंदूबुवा एका विशिष्ट धर्माचा असून, तो कोणाच्या इशार्‍यावर लोकांना धर्मांतरासाठी बळजबरी करतो काय याबाबतही सखोल चौकशी व्हावी तसेच भोंदूबुवाची सखोल चौकशी करून ठोस पुरावे मिळवावेत आणि त्यावर बोगस डॉक्टर तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी बुवाबाजी विरोधी संघर्ष संस्थेचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, सचिव महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button