नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी | पुढारी

नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

पेठ रोडवरील फुलेनगरमध्ये ३० वर्षे जीर्ण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीची संरक्षक भिंत कोसळून एक पाचवर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास घडली असून, भविष्यात आणखी काही दुघर्टना घडण्यापूर्वीच मनपाने येथील रहिवाशांना नवीन घरकुल बांधून द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी व नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सन १९९२ ते १९९७ या पंचवार्षिकमध्ये मनपाच्या वतीने फुलेनगरमधील गोंडवाडी येथे जुनी घरे काढून नागरिकांना राहण्यासाठी दुमजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी डागडुजी न झाल्याने ही इमारत जीर्ण झालेली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार मनपाकडे मागणी करूनही इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच मंगळवारी या इमारतीचा काही भाग कोसळला. यात एक मुलगा जखमी झाला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी आणखी एखादी घटना घडण्यापूर्वीच मनपाने येथील नागरिकांसाठी घरकुल उभारावे व त्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या या धोकादायक इमारतीत तीनशेहून अधिक रहिवासी जीव धोक्यात घालून वास्तव्य करीत आहेत. ही बाब अन्यायकारक असून, त्या गरीब रहिवाशांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, प्रा. सरिता सोनवणे, गुरुमित बग्गा, मोनिका हिरे आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे पूर्णपणे धोकादायक झालेल्या या इमारतीत तब्बल १०० हून अधिक कुटुंबे राहत आहेत. भविष्यात आणखी काही घटना घडण्यापूर्वीच मनपाने याकडे लक्ष देऊन अलर्ट होण्याची गरज आहे. मंगळवारच्या घटनेने मनपाला एक प्रकारे सावधानतेचाच इशारा दिला आहे. – – हेमंत शेट्टी, माजी नगरसेवक, पंचवटी.

हेही वाचा :

Back to top button