नाशिक : रस्त्यावर चिखल झाल्याने चौघा बिल्डरांना दंड, घनकचरा व्यवस्थापन विभागाची कारवाई | पुढारी

नाशिक : रस्त्यावर चिखल झाल्याने चौघा बिल्डरांना दंड, घनकचरा व्यवस्थापन विभागाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखल आणि धुळीचे साम—ाज्य निर्माण होत असल्याने त्याचा नागरिकांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीची गंभीर दखल घेत मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सातपूर, पश्चिम आणि नाशिकरोड या विभागातील चार बांधकाम व्यावसायिकांना 85 हजारांचा दंड केला आहे.

शहरात बांधकामांमुळे तेथील माती आणि चिखल डंपरद्वारे वाहून नेताना रस्त्यावर पडत असल्याने मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नगर रचना विभागाला नोटीस बजावून संबंधित बांधकाम व्यावसायिकांना उपाययोजना करण्याची सूचना केली होती. परंतु नगर रचना विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाने सातपूर विभागात दोन बांधकाम व्यावसायिकांना 25 आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर पश्चिम विभाग आणि नाशिकरोड विभागात दोघा व्यावसायिकांवर प्रत्येकी 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या आदेशाने ही कारवाई झाली.

शहरात संततधारेमुळे आधीच शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने नाशिककर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्डे चुकवत वाहनधारक घसरून पडत आहेत. पादचार्‍यांना तर रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत धरूनच चालावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे कमी की काय म्हणून आता नागरिकांना रस्त्यांवरील चिखल आणि धुळीचाही सामना करावा लागत आहे. इमारतीच्या बांधकामाच्या साहित्यामुळे निर्माण झालेली धूळ नागरिक तसेच वाहनधारकांच्या डोळ्यांत जात असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून, चिखलामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

तिडके कॉलनी रस्त्यावर चिखलच
बांधकाम साहित्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्यास त्याची दक्षता घेणे व त्याकरता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची आहे. परंतु, त्याबाबत बांधकाम व्यावसायिक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहेत. तिडके कॉलनीतून गोविंदनगरला जोडणार्‍या रस्त्यालगत बांधकाम सुरू असल्याने त्या ठिकाणचा चिखल आणि माती रस्त्यावर पडून वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा :

Back to top button