

फलटण : पुढारी वृत्तसेवा फलटण ते सातारा रस्त्यावर बाणगंगा नदीच्या पुलावर खडीवरुन दुचाकी घसरून दुचाकी बसच्या मागील चाकाखाली आल्याने एक जण ठार झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात एक जण जखमी झाला असून या घटनेची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
नवनाथ उर्फ आबा भिवा फरांदे (रा. फरांदवाडी, ता. फलटण) असे ठार झालेल्यांचे नाव आहे. तर त्यांचा पुतण्या रूपेश राजेंद्र फरांदे (वय 19) हा जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी 9.15 वाजता रूपेश व नवनाथ हे दोघे दुचाकी (क्रमांक एम. एच. 11 बी.एफ. 8544) वरून मुधोजी कॉलेजकडे निघाले होते. फलटण-सातारा रस्त्यावर बाणगंगा नदीच्या पूलावर नवनाथ यांची दुचाकी आली असता एक वाहन एस. टी. बसला ओव्हरटेक करून नवनाथ यांच्या अंगावर आले. त्यामुळे नवनाथ फरांदे यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला. यावेळी त्यांची दुचाकी खडीवरून घसरून दोघेही खाली पडले. यावेळी नवनाथ हे बसच्या पाठीमागील चाकाखाली आले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रूपेश हा जखमी झाला. अपघातानंतर बस चालक पसार झाला.