Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक | पुढारी

Nashik : रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात संततधारेमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले असून, रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशी भयानक अवस्था निर्माण होऊनही बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी (दि. 19) शिवसेना पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन आक्रमक पवित्रा घेतला.

यासंदर्भात मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी अनेक बाबी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून, वाहनधारक तसेच पादचार्‍यांना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच वाहनधारक आणि नागरिकांचे आरोग्य बिघडत असल्याने त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न बोरस्ते यांनी उपस्थित केला. नवीन रस्त्यांचे काम खराब व दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका उत्पन्नातील बहुतांश भाग रस्ते निर्मिती व दुरुस्तीवर खर्च होत असतो. रस्ते निर्मितीची व रस्ते दुरुस्तीची गुणवत्ता कायम राहण्यासाठी स्वतंत्र गुण नियंत्रण विभागदेखील आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत रस्त्यांची दुरवस्था बघता, सार्वजनिक बांधकाम विभाग व कामाच्या दर्जावर नियंत्रण ठेवणारा हा विभाग अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो. रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही दर्जा राहात नसेल व नागरिकांना नाहक प्राण गमवावे लागत असतील, तर हा करदात्यांवर अन्यायच म्हणावा लागेल. अनेक रस्ते तयार होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. असे नवीन रस्तेदेखील खराब झाले आहेत.

कंत्राटदाराकडे असलेल्या दुरुस्तीची कामेही महापालिका करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यावरून ठेकेदारांना अधिकार्‍यांकडून पाठीशी घालण्याचे काम होत असल्याची बाबही बोरस्ते यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button