गटविकास अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर जेऊर ग्रामपंचायत कार्यालय उघडले | पुढारी

गटविकास अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर जेऊर ग्रामपंचायत कार्यालय उघडले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायत सदस्यांनी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी (दि.18) ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावले होते. ग्रामपंचायत सदस्य व गटविकास अधिकारी यांच्यात चर्चा होऊन जेऊरला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते.

ग्रामविकास अधिकार्‍याअभावी गावात विकासकामे व नागरिकांची गैरसोय होत असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे होते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय बंद करण्यात आल्यानंतर सदस्य व गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्यात या विषयावर चर्चा झाली. यावेळी सर्वच सदस्यांनी ग्रामसेवकाबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. खरात यांनी मंगळवारपर्यंत (दि. 23) विस्तार अधिकारी यांना पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल.

कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले. यावेळी उपसरपंच श्रीतेश पवार, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटोळे, अनिल ससे, गणेश पवार, गणेश तवले, मुसा शेख, अप्पा बनकर, सुभाष पवार आदी उपस्थित होते.

गांगर्डेंकडे तीन गावांचा पदभार
सद्यस्थितीत ग्रामसेवक म्हणून राहुल गांगर्डे यांच्याकडे जेऊर गावचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. गांगर्डे यांच्याकडे जेऊर बरोबरच इमामपूर, धनगरवाडी गावचा पदभार आहे. एका ग्रामसेवकाकडे तीन-तीन गावांचा पदभार असल्याने गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध राहत नाही, अशी तक्रार सदस्यांनी केली.

 

Back to top button