विनाहेल्मेट पेट्रोल पंपावर धिंगाणा घालणारेच देताय हेल्मेट वापराचा संदेश! | पुढारी

विनाहेल्मेट पेट्रोल पंपावर धिंगाणा घालणारेच देताय हेल्मेट वापराचा संदेश!

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

म्हसरुळ पोलिसांनी पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट धिंगाणा घालून पंप चालकाला मारहाण करणाऱ्या संशयितांना सात दिवस पेट्रोल पंपावर वाहनचालकांचे प्रबोधन करण्याची शिक्षा सुनावली आहे. एरवी एखाद्या टोळक्याने गुन्हा केल्यानंतर पोलीस त्यांची भरचौकात धिंड काढतात आणि त्यांच्याकडून उठाबशा काढून घेतात, असे शिक्षेचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र म्हसरूळ पोलीस याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी दिलेल्या अनोख्या शिक्षेची चांगलीच चर्चा रंगली असून नाशिककरांनी स्वागत केले.

पोलीस आयुक्तांच्याच आदेशाला आव्हान

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू केली आहे. मात्र दिंडोरीरोडवरील इच्छामणी पेट्रोलपंपावर बुधवार दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी चौघा संशयितांनी विनाहेल्मेट पेट्रोलची मागणी केली. मात्र येथील कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड (२४, रा. चाचडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक) यांनी पोलीस आयुक्तांचे आदेश असल्याने विनाहेल्मेट ग्राहकांना पेट्रोल देण्यास नकार दिला.. त्यावरून पंप कर्मचारी व संशयितांमध्ये वाद झाला. यात चौघांनी गायकवाड यांना मारहाण केली.

या प्रकारामुळे एकप्रकारे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला आव्हानच दिले गेले. त्यामुळे म्हसरूळ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या प्रकरणी संशयितांना जेरबंद केले. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पेट्रोल पंपावर भेट दिली व पंप कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

प्रबोधनाची अनोखी शिक्षा

दरम्यान, घटनेच्या आठवडाभरानंतर सोमवारी (दि.३०) म्हसरूळ पोलिसांनी या संशयिताना अनोखी शिक्षा केली आहे. या संशयितांनी हातात फलक घेऊन पेट्रोल पंपावर हेल्मेटशिवाय येणाऱ्या वाहनचालकांचे सात दिवस प्रबोधन करावयाचे आहे. त्यानुसार सोमवारपासून या अनोख्या शिक्षेला सुरुवात झाली आहे. हेल्मेटशिवाय पेट्रोल मागत धुडगूस घालणारे संशयितच आता या पेट्रोल पंपावर प्रबोधनात्मक संदेशाचे फलक हाती घेऊन उभे आहेत.

पेट्रोल भरण्यास येणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करत असून, हेल्मेट वापरा सुरक्षित रहा”, असा संदेश देत ‘पेट्रोल पंपचालकांना सहकार्य करा’ असे आवाहनही करीत आहेत. यावेळी सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावीत, पोलिस निरीक्षक अशोक साखरे, सहायक पोलिस निरीक्षक सदाशिव भडिकर, सुधीर पाटील,पोलिस उपनिरीक्षक मुयुर पवार,माळी म्हसरूळ गुन्हे शोध पथक उपस्थित होते.

Back to top button