मेळघाट : विषबाधेने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू | पुढारी

मेळघाट : विषबाधेने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : मेळघाट च्या अतिदुर्गम असणा-या डोमा येथे एकाच कुटुंबातील तिघांचा विषबाधीने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ वर्षीय मुलगा आयुष बुधराज बच्छले, बुधराज बच्छले (वय ३४) आणि आई लक्ष्मी बच्छले (३०) (सर्व राहणार डोमा) यांचा समावेश आहे.

अधिक माहिती अशी की, २७ ऑगस्ट रोजी काटकुंभ आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या डोमा येथील बच्छले कुटुंबांतील एकुण दहा जणांना विषबाधा झाली होती. त्यात आठ वर्षीय आयुषचा त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. तर बुधराज यांच्यासह त्यांची पत्नी लक्ष्मी बच्छले, मुलगी रिया (१७ ), मुलगा निखिल (८), दमड्या बच्छले (४४), त्यांची पत्नी नानु दमड्या बच्छले (४२), पिंन्टू तुकाराम सेमलकर यांना अतिसाराची लागण झाली होती.

बुधराज व लक्ष्मी यांची स्थिती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी बुधराज तर रविवारी लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. उर्वरित रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते आहे. नेमकी बच्छले कुटुंबांतील सदस्यांना विषबाधा कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने डोमा गावात शोककळा पसरली आहे.

डोमा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव सातपुते यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त गावकर्‍यांनी डॉ. सातपुते यांना मारहाण केली. या मारहाण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी माहिती दिली आहे.

एकापाठोपाठ एकाच कुटुंबातील सदस्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी समाज बांधवांनी केली आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांचा प्रकोप वाढलेला आहे. गावागावात या रोगांच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अनेक गावात जिवघेण्या डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच अतिसाराचेही रूग्ण वाढलेले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

डोमा येथील रूग्णांची आरोग्य विभागाने बच्छले कुटुंबांतील सर्व रूग्णांची विषेश काळजी घेतली होती. तरी पण त्यांना आपले प्राण गमवावे लागले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यचे नेमके कारण स्पष होईल.
आदित्य पाटील (तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा)

Back to top button