नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता | पुढारी

नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे ९० मीटर हायड्रोलिक शिडी अर्थात, एरिअल लॅडर प्लॅटफॉर्म खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, ही शिडी खरेदी करताना अग्निशमनकडून नियम व अटी-शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

ब्रोटो स्कायलिप्ट ही अग्निशमन व बचावाच्या दृष्टीने ९० मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची एकमेव कंपनी असून, मुंबई, ठाणे यासह भारतात विविध ठिकाणी ९० मीटरपेक्षा जास्त युनिटस आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर येथील मागील निविदांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांचे पुनरावलोकन केल्यास तेच ९० मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्मसाठी मानके ठरू शकतात. तांत्रिक वैशिष्ट्य नसलेल्या आणि अशा प्रकारची शिडीचे उत्पादन भारतात न करणाऱ्या विशिष्ट कंपनीला नजरेसमोर ठेवून निविदा प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मनपा अग्निशमन विभागाने निविदेतील अटी-शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप तक्रारीद्वारे आयुक्तांकडे करण्यात आला आहे. १४ जुलै रोजी निविदा प्रकाशित करण्यात आली आणि प्री-बीड पॉइंटस् सबमिशनची परवानगी १६ जुलैपर्यंतच देण्यात आल्याची संशयास्पद बाब असून, सर्व निविदा प्रक्रियेत १० दिवसांचा कालावधी दिला जातो. असे असताना या निविदा प्रक्रियेत केवळ दोनच दिवसांचा अवधी कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अग्निशमन विभाग खरेदी करत असलेल्या हायड्रोलिक शिडीबाबत भारतात कोठेही सेवा वा स्पेअर पार्टस् उपलब्ध नाही. यासंदर्भात योग्य कार्यवाही करून निविदा प्रक्रिया रद्द न केल्यास त्यास आव्हान देण्याचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला आहे. निविदा खरेदी प्रक्रियेतील नियम व अटी-शर्तीप्रमाणे भारतातील ग्राहकांची तपशीलवार यादी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच भारतातील अंतिम वापरकर्त्यांकडून किमान तीन युनिटस्च्या पुरवठ्याचे समाधानकारक कार्यप्रदर्शन प्रमाणपत्रे देण्याची विनंती केली आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांत भारतात कोणत्याही उंचीचे एकही युनिट संबंधित पात्र ठरविलेल्या ठेकेदार कंपनीने दिलेले नाही. त्यामुळे अशा निविदाधारकास पात्र कसे ठरविणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित पुरवठाधारक कंपनीने भारतातील त्यांचे एजंट अनेकदा बदलले आहेत. त्यामुळे भारतात विक्रीनंतरचा कोणताही योग्य आधार नसल्याने शिडी खरेदीनंतर वॉरंटी तसेच देखभाल दुरुस्तीसंदर्भात अनेक अडचणी निर्माण होण्याची भीती आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. मनपाच्या निविदा प्रक्रियेतील संबंधित कंपनीने त्यांच्या अधिकार पत्रात दावा केला आहे की, ते भारतात गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे प्रतिनिधित्व करत असून, फायरस्केपने प्रशिक्षित असे कर्मचारी असल्याचे म्हटले आहे. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हायड्रोलिकचे प्रात्यक्षिक दाखवा

बिडरची पात्रता आणि पात्रता प्रस्थापित करणाऱ्या कराराअंतर्गत वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी बोली लावणारी कंपनी ही संबंधित वस्तूंचे उत्पादन करणारी आणि गेल्या पाच वर्षांत जगातील विविध अग्निशमन सेवांना किमान १०० युनिटस्चा पुरवठा करणारी तसेच किमान प्रतिष्ठित अग्निशमन सेवांना १० युनिटस्चा पुरवठा करणारी तसेच थेट प्रात्यक्षिक सादर करणारी असावी, अशी अट निविदा प्रक्रियेत आहे. मनपानेदेखील अटी-शर्तींमध्ये अशा युनिटस्चे थेट प्रात्यक्षिक मागविले असून, त्यानुसार मनपाच्या अग्निशमन विभागाने संबंधित बोलीदारांना त्यांच्या ९० मीटर युनिटचे भारतात प्रदर्शन करण्यास सांगावे, असे आव्हान करण्यात आले आहे.

शहानिशा करून खात्री करा

फायरस्केप कंपनीने अनुभवाच्या दाखल्यात अकोला आणि गोंदियामध्ये निधी एंटरप्रायजेसद्वारे दोन हायड्रोलिक प्लॅटफॉर्मचा पुरवठा केल्याचे म्हटले असून, याबाबत नाशिक मनपाने अकोला आणि गोंदिया या दोन्ही आस्थापनांशी पत्रव्यवहार करून शहानिशा करावी म्हणजे सत्य समोर येईल, असा दावाही तक्रारीद्वारे आयुक्तांकडे करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button