सांगली : सरसकट पाणीपट्टीचा रोष आज महासभेत उमटणार | पुढारी

सांगली : सरसकट पाणीपट्टीचा रोष आज महासभेत उमटणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने नळ कनेक्शन नसलेल्यांनाही सरसकट पाणीपट्टी आकारून बिले दिल्याने नागरिकांमधून उमटलेला रोष गुरुवारी महासभेत उमटणार आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची बिले स्वतंत्र देणे व नळकनेक्शन नसलेल्यांना पाणीपट्टी न आकारण्याचा धोरणात्मक निर्णय होणार आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्ग ‘मॉडेल रोड’ कामाच्या मान्यतेचा मार्ग मोकळा होणार आहे. गावभागात महापालिकेच्या दवाखान्यात गुलाबराव पाटील मेमोरिअल ट्रस्टमार्फत ‘होमिओपॅथी’ च्या मोफत औषधोपचारास मान्यतेवरून राजकारण पेटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

महापालिकेची महासभा गुरुवारी होणार आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. महासभेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपची स्वतंत्र पार्टी मिटींग झाली. महासभेत अनेक विषयावर या सभेत वादळी चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिकेचे कराचे उत्पन्न वाढावे तसेच घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील अपुर्‍या कर्मचार्‍यांवर येणारा कर वसुलीचा ताण कमी व्हावा यासाठी प्रशासनाच्या सूचनेवरून घरपट्टी व पाणीपट्टी एकत्रीकरण करण्याचा निर्णय मागील महासभेत झाला होता. प्रशासनाने याची तातडीने ंअमलबजावणी करत महापालिका क्षेत्रातील सर्वच म्हणजे 1 लाख 42 हजार मालमत्ताधारकांना घरपट्टी सोबत पाणीपट्टीचीही आकारणी करत बिले दिली. लहान व्यवसाय, दुकान गाळे, ग्रुप कनेक्शन तसेच नळ कनेक्शन नसलेल्यांना, खुल्या भूखंडधारकांनाही पाणी बिले दिल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त झाला. सर्व राजकीय पक्ष, संघटनांनीही विरोध केला. दरम्यान, प्रशासनाने ठरावाचा चुकीचा अर्थ काढल्याचे सांगत महासभेत धोरणात्मक निर्णय होईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, या विषयावर महासभेत चर्चा होईल. प्रशासनावर राग काढला जाईल आणि नळ कनेक्शन नसलेल्यांना पाणी बिल दिले जाणार नाही, असा निर्णय होईल.

सांगलीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्ग (शंभर फुटी रस्ता) हा ‘मॉडेल रोड’ करण्यासाठीचा विषय महासभेच्या अजेंड्यावर आणला जाणार होता. मात्र विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे (मिरज) व राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते (कुपवाड) यांनी केवळ सांगलीतीलच रस्ता विषयपत्रकावर का?, मिरज व कुपवाडमधील रस्ताही निवडा व त्यानंतरच विषय महासभेपुढे घ्या, असा आग्रह धरला. त्यामुळे महासभेच्या अजेंड्यावरून हा विषय वगळण्यात आला. त्यावरून काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, नसिमा नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. त्याचे काँगे्रस, भाजपच्या पार्टी मिटींगमध्येही उमटले. राजर्षी शाहू महाराज मार्ग मॉडेल रस्ता म्हणून विकसित करण्यास मान्यता देणे व त्याचबरोबर मिरज आणि कुपवाडमधील रस्ताही मॉडेल रोड म्हणून विकसित करण्याचा ठराव करण्यात येणार आहे.

गावभाग येथे महापालिकेचा अ‍ॅलोपॅथी दवाखाना क्रमांक 6 आहे. या दवाखान्यात पूर्वी होमिओपॅथी दवाखाना सुरू होता. डॉक्टर व औषधाचा खर्च महापालिका करत होती. मात्र डॉक्टरांच्या निवृत्तीनंतर होमिओपॅथी उपचार बंद झाले. त्यामुळे याठिकाणच्या दवाखान्यातील एका खोलीत गुलाबराव पाटील मेमोरिअल ट्रस्टच्या हॉमिओपॅथी कॉलेज व हॉस्पिटलमार्फत मोफत होमिओपॅथी औषधोपचार करण्यास मान्यतेचा विषय महासभेपुढे आहे. हा विषय मंजूर करण्याचा निर्धार बुधवारी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या पार्टी मिटींगमध्ये झाला, तर विरोध करण्याचा निर्णय भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये झाला. या विषयावरून राजकारण पेटले आहे.

दुप्पट दंडाविरोधात प्रशासन धारेवर

नगरविकास विभागाच्या दि. 10 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन गुंठेवारी विभागातील रहिवाशांना घरपट्टीच्या आकारणीमध्ये बांधकाम परवाना किंवा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्यास दुप्पट दराने दंड आकारला जात आहे. शासन निर्णयामध्ये महानगरपालिका असा उल्लेख आलेला नाही. शासन निर्णयामध्ये सदनिका असा शब्द वापरण्यात आलेला आहे. ज्या बिल्डरने बांधकाम परवाने घेतलेले नाहीत किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेट नाहीत, अशा सदनिकांमधील मालमत्तांना कर लावण्याबाबत ते निर्देश आहेत. प्रशासनाने मात्र सरसकट अंमलबजावणी सुरू केली आहे. हे गुंठेवारी क्षेत्रातील लोकांसाठी अन्यायी आहे. महासभेत आवाज उठवणार आहे, असे नगरसेवक अभिजित भोसले यांनी सांगितले.

Back to top button